पशुपालनातून समृद्धीकडेः शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे, शेळ्या, मांसल पक्षी वाटपासाठी नाविन्यपूर्ण योजना

पशुपालनातून समृद्धीकडेः शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे,
शेळ्या, मांसल पक्षी वाटपासाठी नाविन्यपूर्ण योजना
शेतीला पुरक उद्योग म्हणून अनेक शेतकरी पशुपालन-दुग्धोत्पादन करीत असतात. तसेच अनेक शेतकरी आता कुक्कुटपालनाकडे वळून अंडी व मांसल पक्षी उत्पादनाकडेही वळले आहेत. तसेच शेळी पालनालाही चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. 2017-18 या वर्षात शासनाने राज्यातील दूध उत्पादन,शेळी व्यवसाय आणि मांसल कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अनुदानावर दुधाळ जनावरे, पक्षी, शेळी  वाटप केल्या जातात. शेतकऱ्यांसाठी योजनेची माहिती पुढीलप्रमाणे देत आहोत.
 दुधाळ संकरीत गाई,म्हशींचे गट वाटप योजनाः-
 या योजनेअंतर्गत 6/4/2 दुधाळ संकरीत गायी/म्हशी अशा एका गटासाठी किंमत याप्रमाणे- सहा जनावरांच्या गटास 3 लाख 35 हजार 184 रुपये, चार  जनावरांच्या गटास एक लाख 70 हजार 125 रुपये व दोन जनावरांच्या गटास 85 हजार 61 रुपये इतके आहे.  या किमतीपैकी सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50 टक्के व अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीसाठी 75 टक्के अनुदान  देय राहील.
लाभार्थी निवड निकष- महिला बचत गटातील लाभार्थी, अल्प भूधारक शेतकरी (एक हेक्टर पर्यंत), सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
2. शेळ्या,मेंढ्या व 1 बोकड गट वाटप योजना- या योजने अंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड अशा एका गटासाठी 64 हजार 886 रुपये इतकी असून अनुदान सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50 टक्के व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी 75 टक्के राहील.
लाभार्थी निवड निकष- दारीद्र्य रेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी(1 हेक्टर  पर्यंत),अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंत), सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले) 5 महिला बचत गटातील लाभार्थी
मांसल कुक्कुटपालन गट वाटप योजना-या योजने अंतर्गत 1000 मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करणे.एका गटासाठी 2 लाख 25 हजार रुपये  इतकी किंमत असुन  सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50 टक्के अनुदान व अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी 75 टक्के राहील.
लाभार्थी निवड निकष- अत्यल्प भूधारक शेतकरी(1 हेक्टर  पर्यंत), अल्प् भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टर पर्यंत), सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले) 5 महिला बचत गटातील लाभार्थी
या योजनेबाबत अधिक माहिती तसेच अर्ज  प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे उपलब्ध आहे.  इच्छूक शेतकऱ्यांनी  संपर्क साधून दि. 9 ऑगस्ट पूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अर्जासोबत शेतीचा सातबारा, 8-अ चा उतारा, दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र,ओळखपत्र, जातीचा दाखला,अपत्य दाखला, शिधाप‍त्रिका, महिला बचतगट, सुशिक्षीत बेरोजगार,अपंग इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. लाभार्थी निवडतांना 30 टक्के महिलांना व 3 टक्के अपंगांना प्राधान्य देण्यात येईल.
  या योजने अंतर्गत मागिल वर्षी  सन 2016-17 या वर्षात ज्या लाभार्थींना या योजनेंसाठी अर्ज दिले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची गरज नाही.
योजनेची अंमलबजावणी करतांना कुक्कुटपालनाची शेड, बकऱ्यांची शेड, गोठ्याचे साहित्य , दुध व्यवसायासाठी साहित्य आणि कोंबड्यांचे खाद्य यासाठी द्यावयाचे अनुदान वितरणापूर्वी लाभधारकाने वस्तू, साधन सामुग्री, बांधकामे ही स्वत:च्या हिस्स्यातून, बँक कर्जातून खरेदी करणे,उभारणे आवश्यक आहे. अनुदान हस्तांतरण  नंतर रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
पात्र लाभार्थ्यांनी3 वर्ष योग्यरितीने व्यवसाय करणे बंधनकारक आहे. योजनेतील अटी व शर्तीनुसार पशुधनाचे परस्पर विक्री करणे,स्थलांतर करणे किंवा मालमत्तेचा वापर न करणे, यासाठी लाभधारकाकडून बंधपत्र करुन  सहमती  घेण्यात येते.
अंमलबजावणी साठी कालबद्ध कार्यक्रम-
तालुकास्तरावरुन प्राप्त परिपूर्ण अर्ज प्रवर्गनिहाय याद्या गोषवाऱ्यासह जिल्हास्तरावर सादर करणे- दि.10 ते 16 ऑगस्ट,
जिल्हास्तरावर प्राप्त झालेल्या अर्जातून मंजूरी योग्य लाभार्थ्यांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करणे-दि.18 ते 24 ऑगस्ट.
प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु करणे- दि.31 ऑगस्ट पासून
लाभधारकांना कार्यादेश दिल्यापासून स्वहिस्सा भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात येते व त्यांचेकडून प्रतिसाद न मिळाल्यास प्रतिक्षाधीन यादीतील प्राधान्यक्रमानुसार  पुढील अर्जदारांना संधी देण्यात येते. शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार, महिला यांनी या योजनेचा फायदा घ्यावा,असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड डॉ.सु.चि.म्हस्के, व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद डॉ.पठाण, यांनी केले आहे.
- संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, अलिबाग- रायगड

०००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक