पावसाचे दिलासादायक पुनरागमन भात लावणीसाठी शेतकऱ्यांची लगबग


अलिबाग दि.14,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसाचे दिलासादायक पुनरागमन झालेले  आहे. गेल्या 24 तासात  एकूण 1565.33 मि. मि. इतके पर्जन्यमान  नोंदविण्यात आले असून शेतकऱ्यांमध्ये भात लावणीसाठी लगबग सुरु झाली आहे.  जिल्ह्यात तब्बल 57 हजार 792 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली असून पावसाच्या पुनरागमनाने  उर्वरित क्षेत्रावरील पेरण्यांना वेग आला आहे.
गेल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने भात लावणीचा वेग कमी झाला होता. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होते.  दरम्यान गेल्या 24 तासात पावसाने दमदार पुनरागमन केले असून  गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण 1565.33 मि. मि. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. कालच्या दिवसभराच्या पावसाची सरासरी  97.83 मि. मि इतकी असून  आज अखेर एकूण सरासरीच्या 40.07  टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.
 या संदर्भात कृषि विभागाकडुन प्राप्त आकडेवारीनुसार,  जिल्ह्यात एकूण 1 लाख 41 हजार 483 हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे.  जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने  भात पिकाची  लागवड सर्वाधिक क्षेत्रावर म्हणजे  1 लाख 23 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर नियोजित आहे. त्यापैकी भात पिकाची 56 हजार 690 हेक्टरवर  म्हणजेच 46 टक्के क्षेत्रावर लागवड झालेली आहे.  जिल्ह्यात भाता सोबत नागली, वरई, इतर तृणधान्ये तसेच  तुर, मूग, उडिद ही  कडधान्ये आदी पिकेही  खरिपात घेतली जातात. पावसाचे हे पुनरागमन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरले असून उर्वरित क्षेत्रात भात लावणीसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक