जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती सभा ग्रामिण भागातील रस्त्यांचा विकास आराखडा तयार करा- ना. गीते यांचे निर्देश


        अलिबाग दि.28, (जिमाका):-  जिल्ह्यातील ग्रामिण भागातील रस्त्यांचा  विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश व्हावा यासाठी रस्त्यांचा विकास आराखडा, अंदाजपत्रके आदी कामे पुर्ण करा, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना. अनंत गीते यांनी आज येथे दिले.
 येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात दिशा समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या बैठकीस अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जि.प. सदस्य किशोर जैन, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, सर्व पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी, जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी ना. गीते यांनी  केंद्राच्या निधीतून राबविण्यात येत असलेल्या  विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना,  प्रधानमंत्री आवास योजना,  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना,  दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, सर्व शिक्षा अभियान अशा सर्व योजनांच्या प्रगतीचा व निधी विनीयोगाचा आढावा घेतला. तसे डिजीटल इंडीया अभियानांतर्गत  कोकण विभागातील सर्व ग्रामपंचायती व शाळांना वायफाय सुविधेने जोडण्याबाबत होत असलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
            यावेळी त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जेणेकरुन समाजातील शेवटच्या माणसापर्यंत योजनेचा लाभ पोहोचेल आणि त्याच्या जीवनात प्रगती होईल.  योजनांवर निधी खर्च होत असतांना समाजात होत असलेल्या विकासाचे परिणामही दिसायला हवेत, असेही त्यांनी यावेळी सुचित केले.
 याबैठकीच्या प्रारंभी ना. गीते यांचे स्वागत अपर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी केले तर  सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सभापतींचे स्वागत  समितीचे अध्यक्ष या नात्याने ना. गीते यांनी केले.  बैठकीचे सूत्रसंचलन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक