राज्यातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील नाट्यगृहाचे लोकार्पण जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस




अलिबाग,दि.7,(जिमाका)- राज्यातील कलावंतांना चांगल, हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करुन देणं हे राज्यकर्ते म्हणून आमचे कर्तव्य आहे. म्हणुनच राज्यात नवीन नाट्यगृहांची निर्मिती करतांना जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकीकरण करुन  राज्याची सांस्कृतिक संपदा जोपासणार, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
अलिबाग शहरात  पीएनपी  सांस्कृतिक कलाविकास मंडळ या संस्थेने सहकारी तत्वावर उभारलेल्या राज्यातील  पहिल्या नाट्यगृहाचे लोकार्पण श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ. जयंत पाटील, आ. सुनिल तटकरे, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, आ. बाळाराम पाटील, श्रीमती मिनाक्षीताई पाटील, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, श्रीमती नलीनी , पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील तसेच जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे कळ दाबून ॲड. नाना लिमये रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. त्यानंतर अलिबाग येथील नमन नृत्य संस्थेच्या कलावंतांनी  नांदीनृत्य सादर करुन या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. त्यानंतर आ. जयंत पाटील यांचा श्री. फडणवीस यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार करुन अभिष्टचिंतन करण्यात आले.
आपल्या भाषणात श्री. फडणवीस म्हणाले की, अलिबाग येथे अत्यंत चांगले नाट्यगृह उभे राहिले आहे. सुंदर आणि सुसज्ज नाट्यगृह सहकार क्षेत्रामार्फत सुरू झाले,हे काम चांगलं आहे, म्हणुनच अशा चांगल्या कामांच्या पाठीशी सरकार उभे आहे. राज्यात कलेचे क्षेत्र रुंदावत आहे. असे असतांना विविध कलाप्रकारांच्या सादरीकरणासाठी राज्यात चांगल्या नाट्यगृहांची आवश्यकता आहे. नाट्यकला ही राज्याची सांस्कृतिक संपदा आहे. ही संपदा जोपासण्यासाठी राज्यात नवी नाट्यगृहे उभारण्यासाठी चालना देतांनाच जुन्या नाट्यगृहांचे आधुनिकरण करण्यासही शासनाचे प्राधान्य असेल, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले. त्याच प्रमाणे सिनेरसिकांना दर्जेदार सिनेमे पाहता यावे यासाठी थिएटर उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आ. जयंत पाटील यांच्या कार्याचा गौरव करतांना श्री. फडणवीस म्हणाले की, आ,जयंत पाटील यांनी हाती घेतलेले काम उत्तम करण्याचा प्रयत्न असतो,राजकारणाच्या पलीकडले संबंध जपणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे नेतृत्व हे संघर्षशील, आत्मविश्वासपूर्ण आणि  उत्तमतेचा ध्यास असलेलं नेतृत्व आहे, अशा शब्दात श्री. फडणवीस यांनी आ. पाटील यांचा गौरव केला. तसेच अलिबाग येथे खुले नाट्यगृह उभारण्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासनही श्री. फडणवीस यांनी यावेळी बोलतांना दिले.
तिकिटांवरील जीएसटीतून उभारणार नाट्यगृहे- ना. तावडे
जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून नाट्य व चित्रपट निर्मात्यांना वाटणारी चिंता लक्षात घेता शासनाने 250 रुपयांवरील तिकीटांवर जीएसटी आकारण्याची मर्यादा ही 500 रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती  जीएसटी नियामक मंडळाला केली आहे. तिकीटांवरील कराच्या रकमेतून राज्याला प्राप्त होणारा निधी नाट्यगृहे बांधण्यासाठीच वापरायचा असे धोरणा शासनाने ठरविले आहे, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ना. विनोद तावडे यांनी आज येथे जाहीर केले.  पीएनपी  सांस्कृतिक कलाविकास मंडळाने उभारलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण प्रसंगी ना. तावडे बोलत होते.  आपल्या भाषणात ना. तावडे यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नाट्यगृह असावं, अशी शासनाची भुमिका असल्याचा पुनरुच्चार केला. चांगले चित्रपट प्रदर्शित करता यावे यासाठीही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात सुविधा उपलब्ध करण्यासाठीही शासन प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी जुन्या कलावंतांच्या आठवणी डिजीटल स्वरुपात संग्रहीत करण्याचा उपक्रमही शासनाने सुरु केल्याची माहिती ना. तावडे यांनी यावेळी दिली.
या वेळी आ. सुनिल तटकरे, आ. जयंत पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळाच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील यांनी केले. याप्रसंगी सदर नाट्यगृह उभारणीत मोलाची कामगिरी करणारे ज्येष्ठ रंगकर्मी  भाऊ सिनकर, शशिकांत मोहिते, भगवान मालपाणी, श्री. डिसूजा, सौरभ खेर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  सिद्धार्थ चांदेकर आणि भार्गवी चिरमुले यांनी केले. या कार्यक्रमास अलिबागकर नाट्यरसिकांची मोठ्याप्रमाणावर उपस्थिती होती.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक