पिक कर्ज व पिक विमा योजना: शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे-जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी

अलिबाग, दि.३ (जिमाका)- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना द्यावयाचे पिक कर्ज, पिक विमा या योजनांचा लाभ देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
शेतकऱ्यांना द्यावयाचे खरीप पिक कर्ज, पिक विमा तसेच कर्ज माफी योजनेअंतर्गत द्यावयाचे १०हजार रुपयांचे अंतरिम कर्ज यांचा जिल्ह्यातील वितरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विशेष समनव्य, सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नन्दनवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे रामदास बघे, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती प्रेमलता जैतू, नाबार्डचे सुधाकर रगतवार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रदीप नाईक,बँक ऑफ महाराष्ट्रचे पाटणकर, पंजाब नॅशनल बँकेचे नलावडे तसेच विविध बँकांचे अधिकारी व शाखाप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पिक कर्ज वाटपाचा बँकांनिहाय आढावा घेतला. कर्ज माफी योजनेत द्यावयाचे १० हजार रुपयांच्या वितरणाबाबत तसेच पिक विमा यासंदर्भात आढावा घेतला.
यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ८९७ खातेदारांना  १०४ कोटी ३६ लाख रुपयांचे खरीप पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. सदर कर्जवाटप हे अधिकाधिक शेतकऱ्यांना झाले पाहिजे, यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध कर्ज योजनांतर्गत  द्यावयाच्या कर्ज वितरण प्रकरणांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सामाजिक सहाय्य योजनांमधील लाभार्थी, तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार हमी योजनेचे नोंदणीकृत मजूर यांची बँक खाती प्राधान्याने आधार संलग्नित करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक