संकल्पकृत होऊ या, 'अवयवदानासाठी'



मानवी आरोग्याच्या विविध  प्रश्नांबाबत वैद्यकशास्त्राने खूप प्रगती केली आहे. अवयवप्रत्यारोपण हा त्या प्रगतीचाच एक टप्पा. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मानवी अवयव प्रत्यारोपण करुन विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. अवयवदानांतर्गत किडनी, लिवरचे प्रत्यारोपण करण्यात येते. तसेच मस्तिष्क स्तंभ मृत पश्चात  किडनी, लिवर, फुफ्फुस, हृदय, त्वचा यासारख्या अवयवांचे दान करता येते.  आपल्या अवयवदानाने एखाद्याला जीवनदान मिळू शकते. महाराष्ट्र राज्यात सध्या 4000 रुग्ण किडनी, 500 रुग्ण लिवर तसेच 10 रुग्ण तातडीने हृदय प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अवयवदानाचे महत्व लक्षात घेऊन समाजात जनजागृती होण्यासाठी 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट 2017 या कालावधीत महाअवयवदान अभियान राबविण्यात आले. अवयवदान या प्रक्रियेविषयी सुज्ञ जनांनी माहिती घेऊन स्वतः अवयवदानासाठी संकल्पकृत व्हावे, हा या अभियानाचा हेतू. त्यानिमित्त अवयवदान या संकल्पनेविषयी अधिक माहिती या लेखाद्वारे देत आहोत.
अवयवदानाची गरज व महत्व जाणून याबाबत जनजागृती होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजागृती अभियान राबवण्याचे सुचित केले. त्यानुसार राज्यात महाअवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. 29 व 30 ऑगस्ट 2017 रोजी  विविध उपक्रमांद्वारे या  अभियानाची जनजागृती केली जात आहे.
अवयवदान काय आहे?
अवयवदान म्हणजे आपल्या शरिरातील अवयव अन्य व्यक्तीसाठी देणे. जिवंतपणी किंवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान होय. अवयवदानाद्वारे आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करुन ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा रुग्णांना जीवनदान देऊ शकतो.
अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया :- एखाद्या जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव अथवा अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे विलग करून तो एखाद्या गरजू रुग्णामध्ये प्रत्यारोपीत करतात. ज्याचा एखादा अवयव कायमस्वरुपी निकामी झाला आहे,अशा रुग्णांसाठी ही प्रमाणित उपचार पद्धती आहे.
कोणत्या अवयवांचे दान करता येते?
अवयवदानात  जिवंतपणी लिवर व किडनी दान करता येते. मस्तिष्क स्तंभ व मृत्यूनंतर किडनी लिवर, फुफ्फुस, हृदय, स्वादुपिंड त्वचा इत्यादी अवयव दान करता येतात.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू :-  ज्या व्यक्तीची हृदयक्रिया चालू आहे पण जिचा मस्तिष्क स्तंभ मृत्यू झाला आहे, अशी व्यक्ती. अर्थात ब्रेन डेड. बहुतेक प्रमुख अवयवांचे म्हणजे मूत्रपिंड, फुफ्फुस, यकृत, हृदय, आतडी, डोळे, त्वचा, हृदयाची झडप व कानाचे ड्रम यांचे दान करू शकतो. अशा रुग्णास डॉक्टरांचे पथक प्रमाणित करते व अशा व्यक्तीने अवयवदानाचा फॉर्म भरला असेल तर नातेवाईकाला कळवितात व किडनी  लिवर, स्वादुपिंड, हृदय, फुफ्फुस, डोळा हे अवयव काढण्यात येतात. विविध पद्धतीने ते संबंधित रुग्णालयाला पोचवले जातात. रुग्णालये व रुग्णांची प्रतीक्षायादी मार्फत ठेवली जाते. या पद्धतीने एक मेंदू मृत झालेली व्यक्ती आठ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते.
नैसर्गिक मृत्यू -  नैसर्गिकरित्या हृदयक्रिया बंद पडून मृत घोषित केलेली व्यक्ती. अशी व्यक्ती फक्त डोळे व त्वचा या अवयवांचे दान करु शकते.
जिवंत व्यक्ती- जिवंत व्यक्ती फक्त आपल्या जवळच्या नातेवाईकांसाठीच अवयवदान करु शकते. रुग्णदात्याच्या जवळचा नातेवाईक म्हणजे आजी, आजोबा, नातू, मुलगी, मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण अथवा पती किंवा पत्नी यांना करु शकतो. या व्यतिरिक्त कोणालाही अवयवदान करायचे असल्यास शासनाची परवानगी घ्यावी लागते. जिवंत व्यक्ती मुत्रपिंड अथवा यकृताचा काही भाग  अशाच अवयवांचे दान करु शकतात.
मस्तिष्क स्तंभ मृत्यू घोषित करणे व अवयवदान कायदेशीर बाबी-  अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी व अवयवांची व्यावसायिक आणि अवैध विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-1994 लागू केला आहे.  त्यानुसार, मस्तिष्क स्तंभ मृत्यूला मान्यता देणे आवश्यक आहे, जेणे करुन मृत्यूनंतर अवयवदान होऊ शकेल.
 तसेच रुग्णांच्या उपचारासाठी मृत व्यक्तीचे अवयव काढणे साठवणे व प्रत्यारोपण करणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कायद्यात तरतूदी करण्यात आल्या आहेत. मानवी अवयवांच्या व्यापार करणे, अवयव विकणे व विकत घेणे, त्यासाठी जाहिरात करणे किंवा अवयव मिळवून देण्यासाठी व्यापारी तत्वावर मध्यस्तता करणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
अवयवदानासाठी काय कराल? एखाद्या व्यक्तीस मृत्यूनंतर आपले अवयवदान करण्याची इच्छा असल्यास त्यांनी कायद्यानुसार संमतीपत्र भरणे आवश्यक आहे. संमतीपत्रावर जवळच्या सज्ञान नातेवाईकांची सही घेणे देखील आवश्यक आहे. 
संमतीपत्र भरुन दिल्यानंतर त्या व्यक्तीस डोनर कार्ड दिले जाते व हे कार्ड दात्याने सतत आपल्या जवळ बाळगणे आवश्यक आहे. जेणेकरुन त्याच्या नातेवाईकाला अथवा मित्र परिवाराला त्याच्या अवयवदान करण्याच्या इच्छेविषयी माहिती होईल. जरी आपण डोनर कार्डवर सही केली असली तरी आपल्या मृत्यूनंतर आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीशिवाय अवयवदान होऊ शकत नाही. म्हणून आपल्या इच्छेविषयी नातेवाईकांना माहिती असणे आवश्यक आहे.
जनजागृतीसाठी विविध विभागांचे सहकार्य
अवयवदान ही संकल्पना अधिक व्यापक प्रमाणात समाजात रुजण्यासाठी  शासनाने जनजागृतीपर उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे.  या अभियानात वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महसूल विभाग, गृह विभाग यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.  या कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता राहण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक कार्यक्रमांचे नियोजन व सनियंत्रण करणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हे अभियान राबवण्यासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी यांच्या सहअध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, रोटरी व लायन्स क्लबचे अध्यक्ष, सर्व पत्रकार, इंडियन मेडिकल असोसिएशन, यांचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सदस्य सचिव आहेत तर तालुका स्तरावर सभापती पंचायत समिती  हे अध्यक्ष असून त्यात स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस उपाधीक्षक, मुख्याधिकारी नगरपालिका, पत्रकार, डॉक्टर्स, समाजसेवक यांचा समावेश आहे. तर तालुका आरोग्य अधिकारी सदस्य सचिव आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्कः
अवयवदानाविषयी  प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयात तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच अधिक माहितीसाठी राज्यस्तरावर खालील पत्त्यावर संपर्क साधावा. झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर, एलटी एमजी हॉस्पिटल कॉलेज इमारत, पहिला मजला, रूम नंबर 29 ए, स्कीन बँक  जवळ, सायन पश्चिम, मुंबई 400032 दूरध्वनी क्र.022-24028197 सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत. शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत. www.ztccmumbai.org ई-मेल आयडी rztccinmumbai@hotmail.com
- संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक