उपराष्ट्रीय पल्स् पोलिओ लसीकरण: जिल्ह्यातील चार तालुक्यात 17 रोजी लसीकरण; पनवेल, उरण, कर्जत, खालापुर तालुक्यांचा समावेश

अलिबाग,(जिमाका)दि.14-  शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांचे पोलिओ रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी रविवार, दिनांक 17 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत रायगड जिल्ह्यातील पनवेल,उरण,कर्जत,खालापूर या चार तालुक्यांचा समावेश असून या तालुक्यातील बालकांना यावेळी लसीकरण करण्यात येईल. पालकांनी आपल्या बालकांना पोलीओचा डोस पाजण्यासाठी लसीकरण केंद्रावर न्यावे, असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.
 या अभियानाच्या पूर्व तयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयातायोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. ए. देसाई, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. संदीप कसबे,  जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शेषराव बढे, जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. सुरेश देवकर,  जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने आदी उपस्थित होते.
 यावेळी माहिती देण्यात आली की, जिल्हाधिकारी रायगड व मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाची आरोग्य यंत्रणा पोलीओ डोस देण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी ग्रामीण भागातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याप्रमाणे शहरी भागात पोलीओ बुथ  उभारण्यात येणार असून सदर बुथवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळात 0 ते5 वर्षे व शून्य  ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा जादा डोस देण्यात येणार आहे.
        जिल्ह्यातील पनवेल,उरण,कर्जत,खालापूर या चार तालुक्यात ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 73 हजार 873 असून त्यांना डोस देण्यासाठी ग्रामीण भागात 1064 आणि शहरी भागात 166 असे एकूण 1230 बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, बसस्थानके, अन्य गर्दीची ठिकाणे इ.ठिकाणी सुद्धा  लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  या मोहिमेसाठी 3108 आरोग्य कर्मचारी यांची बुथवर नेमणूक करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका,शिक्षक तसेच खाजगी संस्थांचादेखील यामध्ये सहभाग घेण्यात आला आहे.
समाविष्ट असलेल्या चारही तालुक्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी यावेळी दिले. तसेच पालकांनी आपल्या बालकास डोस पाजून आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे,असे आवाहन  श्री. पाणबुडे यांनी यावेळी  केले. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक