महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन:भरपूर खेळा; तंदुरुस्त रहा-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

 अलिबाग, (जिमाका),दि.15- विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलीयन (10 लक्ष) निमित्त रायगड जिल्ह्यातही विद्यार्थ्यांचे फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कुरुळ येथील आरसीएफ विद्यालयाच्या मैदानात फुटबॉल 'किक ऑफ' करुन या सामन्यांचा प्रारंभ केला. 'भरपुर खेळा आणि शारिरीक, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा', असा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना दिला.
कुरुळ येथील आर.सी.एफ शाळेजवळील मैदानावर आज सकाळी साडेआठ वाजेपासून शाळकरी विद्यार्थ्यांचे फुटबॉल संघ दाखल होऊ लागले होते.  येथे आयोजित आटोपशीर कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सामन्यांचा प्रारंभ केला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक)सुनिल सावंत, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) शेषराव बढे, पोलीस उपअधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाल, आर.सी.एफ.चे  प्रशासकीय व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, तसेच एस.बी. पोटपोसे, डी.टी. चौधरी,  सी.व्ही . तळेगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आदी अधिकारी तसेच विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शालेय जीवनात खेळण्याचे महत्त्व खूप आहे. फुटबॉल हा खेळ आपणही आपल्या शालेय जीवनात खेळत होतो, अशी आठवण सांगून त्यांनी प्रत्येक मुलाने आणि मुलींनी फुटबॉल खेळले पाहिजे. फुटबॉलचे आंतराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात आयोजित करुन य्व खेळाशी जोडण्याची एक चांगली संधी शासनाने उपलब्ध करुन दिली आहे.  आपण साऱ्यांनी फुटबॉल खेळून आपली शारिरीक व मानसिक तंदूरुस्ती कमवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
त्यानंतर मैदानावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी खेळाडूंचा परिचय करुन घेतला. त्यानंतर नाणेफेक करुन स्वतः फुट्बॉलला 'किक ऑफ' करुन फुटबॉल सामन्याचा शुभारंभ केला. त्यानंतर मैदानावर चाललेल्या रंगतदार फुटबॉल सामन्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी अवलोकन करुन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियनची पार्श्वभूमी

ऑक्टोंबर, 2017 मध्ये भारत देशात 17 वर्षाखालील मुलांसाठी फिफा विश्वचषक कप फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये एकुण 24 देशांचे संघ सहभागी होणार असून देशातील कोलकता, मडगांव (गोवा), कोची (केरळ), नवी दिल्ली, गुवाहटी (आसाम) व मुंबई (महाराष्ट्र) येथे दि. 6 ते 28 ऑक्टोंबर, 2017 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडीयमवर स्पर्धेतील सहा सामन्यांचे आयोजन दि. 6, 9, 12, 18 व 25   ऑक्टोंबर, 2017 या दिवशी होणार आहे. यानिमित्ताने  आज संपुर्ण राज्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य व आनंदासाठी फुटबॉल सामने आयोजित करण्यात आले आहेत. या अभियानानिमित्त  रायगड जिल्ह्यातील 750 प्राथमिक व माध्यमिक शाळांना या फुटबॉलचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक