पत्रपरिषदः उद्यापासून 2ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहिम 'स्वच्छता हीच सेवा'अभियानात सहभागी व्हा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अलिबाग, दि.13 ( जिमाका)- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व  नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत  'स्वच्छता हीच सेवा' ही  विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातही ही मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेत जिल्ह्यातील सर्वस्तरातील नागरिकांनी आणि समाजघटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
 या अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी वरील आवाहन केले.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात राबवावयाच्या मोहिमेची रुपरेषा याप्रमाणे-
शुक्रवार दि. 15  रोजी स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा औपचारिकरित्या प्रारंभ करणे. यात जिल्ह्याचा शुभारंभ  शहरी भागाचा आरसीएफ विद्यालय येथे सकाळी नऊ वाजता होईल तसेच नगरपालिका शाळा क्रमांक 1 येथून स्वच्छता जनजागृती दिंडी काढण्यात येईल. तसेच ग्रामीण भागाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ तुपगाव ता. खालापूर येथे होईल.
 शनिवार दि.16 रोजी आंतराष्ट्रीय क्लिन कोस्ट दिनानिमित्त अलिबाग येथील समुद्र किनाऱ्यावरील परिसराची स्वच्छता श्रमदानातून करण्यात येईल.  तसेच रविवार दि. 17 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत श्रमदान करुन सेवा दिवस साजरा करणे.रविवार दि.24 समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करुन घेऊन समग्र स्वच्छता करणे.
सोमवार दि.25 शहरातील हॉस्पिटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची व्यापक प्रमाणात सफाई करुन सर्वत्र स्वच्छता करणे.रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी शहरातील प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी व्यापक श्रेष्ठ स्वच्छता मोहिम  राबविणे.सोमवार दि.2 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती  यावेळी देण्यात आली.
स्वच्छता सेवा या अभियानात खालील उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.
शहरातील सर्व कुटूंब, रहिवासी कल्याण संघ (RWAs)   व मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्यामार्फत कचरा निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे विलगीकरण करण्याच्या मोहिमेस प्रारंभ करणे.
शहरातील सर्व कुटूंबांना व भाजी मंडई,बाजार संघटना, वाणिज्यिक क्षेत्रामध्ये सुक्या व ओल्या कचऱ्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या कचरा कुंड्यांचे (distbins)मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येईल.
भाजी मंडई, बाजार स्थळे इत्यादी ठिकाणी दुकानदार व व्यापाऱ्यांच्या सोबतीने स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल.
शहरातील उड्डाणपूल,बस स्थानके, उद्याने इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल.
सर्व ऐतिहासिक वारसा स्थळे,जलस्त्रोत, पाणीसाठे, पर्यटन स्थळे इत्यादी ठिकाणी लोक सहभागातून स्वच्छता मोहिम राबविणे.
शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात स्वच्छता शपथ देण्यात येईल.
रहिवासी कल्याण संघ(RWAs)  व रहिवासी वसाहतीमार्फत व्यापक परिसर स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल.
बहुराष्ट्रीय कंपन्या व इतर कॉर्पोरेट  कार्यालयांनी, त्यांच्या कार्यालयीन परिसरात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येईल.
शहरातील नवीन बांधलेल्या अथवा नुतनीकरण केलेल्या सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांचे उद् घाटन करुन ती जनतेसाठी खुली करण्यात येतील.
ग्राहक  नसलेल्या नागरिकांना ही शौचालयाची सुविधा उपलब्ध् होण्यासाठी पेट्रोल पंप व उपहारगृहातील शौचालयांना सार्वनिक शौचालये म्हणून घोषित करण्यात येईल.
रुग्णालयाचे कर्मचारी व रुग्णांच्या कुटूंबीयांना सोबत घेऊन दररोज रुग्णालये व त्यांचा परिसर स्वच्छ् करण्यात येईल.
सार्वजनिक उद्याने, रस्ते,रुग्णालये, शाळा, रहिवासी कल्याण संघ (RWAs)  कार्यालयीन परिसर इत्यादींना स्वच्छता विषयक गुणानुक्रम देण्यात येईल.
 यावेळी जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियानांतर्गत झालेल्या कामांच्या प्रगतीची माहिती देण्यात आली, ती याप्रमाणे-
स्वच्छ भारत नागरी अभियान
हागणदारीमुक्त नगरपालिका-10
हागणदारीमुक्त नगरपंचायती -05
--------------------------------------------
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)-रायगड सद्यस्थिती
एकूण कुटूंब संख्या:-343422 शौचालय असणारे:324699 टक्केवारी:-94.55
शिल्ल्क कुटूंबे:-18723
ग्रामपंचायती :-796
हागणदारीमुक्त ग्रा.पं.:-640
हागणदारीमुक्त बाकी:-156
हागणदारीमुक्त तालुके:-10

काम कमी असलेले तालुके:
कर्जत:-82.88%  शिल्लक कुटूंब:-5455
पेण:-88.52%    शिल्लक कुटूंब:-3501
अलिबाग:-90.32% शिल्लक कुटूंब-3909

 ज्या तालुक्यात कमी काम्झाले आहेत ते तालुके जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दत्तक घेऊन तेथे विशेष मोहिम राबवून ते तालुके हागणदारी मुक्त करण्यात येणार आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे दत्तक पालक अधिकारी असतील.  तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.साळुंखे  हे संपर्क अधिकारी असतील. तर अलिबाग तालुक्यासाठी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, संपर्क अधिकारी समाजकल्याण अधिकारी जी.एम.लेंडी हे असतील तर पेण तालुक्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  तर संपर्क अधिकारी शिक्षण अधिकारी (प्राथमिक) शेषराव बडे हे असतील. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक