सहकारी पतसंस्थांनी शासन निर्णय व कायद्याचा आदर करावा --- शेखर चरेगांवकर



                अलिबाग,(जिमाका)दि.23:-  रायगड जिल्ह्यात कार्यरत सर्व नागरी सहकारी पतसंस्थांनी आपले कामकाज करत असताना शासनाचे निर्णय व कायदे यांचा आदर करावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी आज येथे केले.
   अलिबाग येथील हॉटेल रविकिरण येथे रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थांचा महासंघ मर्या. अलिबाग व सहकार भारती सहकारी प्रशिक्षण सहकारी संस्था मर्या.कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पतसंस्था संचालक,कर्मचारी प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
 या कार्यक्रमाला सहकार भारतीचे अखिल भारतीय महासचिव उदय जोशी, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनचे संचालक सुरेश पाटील, जिल्हा उपनिबंधक पी.एम.खोडकर, चार्टंड अकाऊटंड धुळे श्रीराम देशपांडे, रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे  अध्यक्ष ॲड.जे.टी.पाटील, उपाध्यक्ष दिलीप जोशी आदि मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. चरेगावकर पुढे ते म्हणाले की, पतसंस्था चालविण्यासाठी प्रशासन व व्यवस्थापन या फार महत्वाच्या गोष्टी आहेत, त्यासंबंधी ज्ञान मिळण्यासाठीचे एक साधन म्हणजे प्रशिक्षण असते. पतसंस्थेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला दर्जेदार सेवा  देण्यात यावी. सहकार चळवळ ही लोकांसाठी लोकांनी चालविलेली आहे. त्यामुळे ज्या संस्थांनी कायद्याचे पालन करुन कामकाज केले आहे त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.  कोकणातील नागरी पतसंस्था छोट्या आहेत पण त्या सक्षम आहेत.  जिल्ह्यातील नागरी पतसंस्था सक्षम, सदृढ  झाल्या पाहिजेत व कर्मचारीही भयमुक्त झाला पाहिजे.  तरच आपण गतिमानतेकडे वाटचाल करु.  ज्या संस्था चालकांनी  संस्था चालविण्याची जबाबदारी घेतली आहे त्यांनी आपली स्वत:ची मानसिकता बदलून सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.  तरच आपण आपली पुढील वाटचाल योग्यरितीने करु शकतो, अशा शब्दांत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष ॲड.जे.टी.पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन योगेश मगर यांनी केले.  कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थाचे संचालक, चेअरमन, कर्मचारी तसेच पत्रकार उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक