ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान:गाव विकासाच्या कामांना गती द्या- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)-  ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत ग्राम प्रवर्तकांनी तयार केलेल्या विकास आराखड्याची संबंधित यंत्रणांनी पडताळणी करुन तातडीने गाव विकासाची कामे सुरु करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
जिल्ह्यात  ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत 16 गावांचा विकास ग्रामप्रवर्तकांमार्फत करण्यात येत आहे. त्यासंदर्भात ग्रामप्रवर्तकांनी तयार केलेला गाव विकासाचा आराखडा व त्याचे संभाव्य अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गवळी, मत्स्यविकास अधिकारी अविनाश नाखवा, कौशल्य विकास अधिकारी  सागर मोहिते, स्वदेस फाउंडेशनचे महा व्यवस्थापक तुषार इनामदार तसेच सर्व विभागप्रमुख व सर्व ग्रामप्र्वर्तक उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यात 16 गावांत हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात  माणगाव तालुक्यातील काकळ, वडगाव, मुठावळी तर्फे तळा, तळा तालुक्यातील  शेणवली, चरणी खु.,बोरखर हवेली, श्रीवर्धन तालुक्यातील वाळवती, जासली, पोलादपूर तालुक्यातील  कापडे खुर्द,  बोरखर, गोवेळे, म्हसाळा तालुक्यातील  खारसाई, सांदेरी, महाड तालुक्यातील  बारसगाव, सावने, मोहोत अशा 16 गावांचा समावेश आहे.
या गावांचा विकास आराखडा  यावेळी सादर करण्यात आला. या आराखड्यात सुचविलेली कामे ही ज्या यंत्रणेच्या अखत्यारीत येतात त्या यंत्रणांनी या आराखड्याची पडताळणी करावी. नंतर परिपुर्ण अंदाजपत्रक देऊन, मान्यतेनंतर लगेचच कामांना सुरुवात करावी. पाणी पुरवठा व स्वच्छतेशी निगडीत कामांना प्राधान्य द्यावे. ग्रामप्रवर्तकांनी आपल्या गावातील गावकऱ्यांना स्वच्छतेसाठी  प्रवृत्त करुन स्वच्छता उपक्रमात लोकसहभाग वाढवावा. जास्तीत जास्त कामे ही रोजगार हमी योजनेच्या निधीतून घेऊन, गावकऱ्यांना रोजगार देऊन गावाचा विकास घडवून आणावा, अशा सुचनाही  डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.  सामाजिक अर्थसहाय्य योजनांपासून गावातील  एकही पात्र लाभार्थी वंचित राहता कामा नये,याकडे ग्रामप्रवर्तकांनी विशेष लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक