आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून रायगडचा विकास करण्याचे नियोजन-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


        अलिबाग,(जिमाका)दि.6- रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. रायगड जिल्हा हा अनेक प्रकारची वैशिष्ट्य असलेला  ऐतिहासिक जिल्हा आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला रायगड किल्ला आणि अन्य पर्यटनस्थळांचा विकास आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारीत करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करतांना डॉ. सूर्यवंशी बोलत होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी 'लोकराज्य' मासिकाच्या सप्टेंबर 2017 च्या अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  रायगड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना मी प्रथम रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.  शालेय जीवनापासून शिवछत्रपतींच्या इतिहासाचा अभ्यास करत असतांना रायगड जिल्ह्याविषयी येथील गावां विषयी कुतूहल होते.
ऐतिहासिक पर्यटनाला चालना
 ते म्हणाले की, शासनानेही रायगड किल्ल्याच्या विकासासाठी मोठी योजना मंजुर केली आहे. 59 कोटी रुपयांचा निधी प्राप्तही झाला आहे. नुकतेच दिल्ली येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक झाली असून त्यांच्या मार्गदर्शनात रायगड किल्ला पर्यटन विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर लवकरच सुरु होतील.  त्यात साऊंड आणि लाईट शो, तसेच काही पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या सुविधा उपलब्ध केल्या जातील.  रायगड किल्ला हा प्लास्टिकमुक्त करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशिल आहोत. त्यासाठी रिकाम्या प्लास्टिक बाटल्या घेण्याची मशिन्स उभारण्याचा प्रयत्न आहे.   रायगड जिल्ह्यात असणाऱ्या विविध ऐतिहासिक स्थळांना जसे प्राचीन गावे, वीर पुरुषांची गावे, खिंडी यांना जोडून  ऐतिहासिक पर्यटनाचे एक सर्किट विकसित करण्यासाठी समाजातील तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात येईल. तसेच इंटरनेटवर विविध सर्च इंजिन्सवरही रायगड शब्द टाकल्यावर रायगड किल्ल्याची माहिती यावी, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन केंद्राबाबत माहितीपट तयार करणे व त्याचे वेबवर प्रसारण करणे आदी विविध उपक्रम यासाठी सुरु झाले आहेत.
समुद्रकिनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे विकास व स्थानिकांचा सहभाग
रायगड जिल्ह्यात असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांचा अर्थात बिचेस चा आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे विकास करुन पर्यटन विकासाला चालना द्यावयाची आहे. अर्थात स्थानिक नागरिकांचा सहभाग त्यात असणे आवश्यक आहे. तरच खऱ्या अर्थाने पर्यटन विकास होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी पर्यटन सुविधांसंदर्भात असणारी कौशल्ये विकसित करण्याचे प्रशिक्षणही स्थानिकांना देण्यात येईल.
कौशल्य विकासातून स्थानिकांना रोजगार
 जिल्ह्यात उद्योग मोठ्याप्रमाणावर आहेत. या उद्योगांच्या गरजेनुसार 18 ते 45 वयोगटातील स्थानिक लोकांना कौशल्य विकास प्रशिक्षण  देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी उद्योगांचे सहकार्य घेण्याचा मानसही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गावविकासाला चालना
 माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या खेडी विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतीत मुख्यमंत्र्यांचे छात्रवृत्तीधारक दाखल होत आहेत. त्यांच्या माध्यमातून गाव विकासाला चांगली चालना आपल्या जिल्ह्यात मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रस्ते कामांना लवकरच सुरुवात
रस्ते कामांना लवकरच सुरुवात होईल. कारण भूसंपादन करुन जमिनी नॅशनल हायवे आणि सार्वजनिक बांधकाम विभागांना ताबा देण्यात आला आहे. त्यामुळे ही कामेही लवकरच मार्गी लागतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गटशेतीतून  सेंद्रीय शेतीचा विकास
जिल्ह्यात दूर्गम भागात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे भात उत्पादक, भाजीपाला उत्पादक आणि आंबा उत्पादक अशा तीन पिकांसाठी सामुहिक गट शेती ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून थेट मार्केटींगचा लाभ या शेतकऱ्यांना मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य सुविधांचा विकास
आरोग्य हा विषय आपल्यासाठी नेहमीच प्राधान्याचा विषय असून  जिल्ह्यातील ग्रामिण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी उद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीचा अधिकाधिक वापर आपण करु.  जिल्हा रुग्णालयातही डायलिसीसची सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
मत्स्य शेतीला चालना
जिल्ह्यातील धडपड्या शिक्षकांसाठी धडपडमंच स्थापन करुन शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. तसेच नागरिकांना द्यावयाच्या सेवा हमी या संदर्भात पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यावर आपला भर असेल.  तसेच जिल्ह्यात मत्स्य शेतीला असलेला वाव पाहता त्याच्या विकासासाठी आपण विशेष प्रयत्न करु. अशाच प्रकारे पेण येथील मूर्तिकार आणि त्यांच्या उद्योगाशी निगडीत  उपक्रम राबविण्याचा विचार प्राथमिक स्तरावर सुरु आहे. जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या प्रश्नांसंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली  समिती स्थापन करुन या समस्या मार्गी लावण्याबाबतही आपण प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
लोकराज्य अंकाचे प्रकाशन
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'लोकराज्य' या मासिकाच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकात जिल्हा विकासाची माहिती देण्यात आली असून संपुर्ण राज्यात होत असलेल्या जिल्हा विकास योजनांची तसेच शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या कामांची माहिती यात देण्यात आली आहे. ही माहिती अत्यंत उपयुक्त असून हा अंक अत्यंत वाचनीय आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने  व पत्रकार उपस्थित होते.
०००००

            

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक