ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान गाव विकासासाठी वास्तवदर्शी आराखडा हवा- माजी मुख्यसचिव गायकवाड


अलिबाग,(जिमाका)दि.9- ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत  गावांचा विकास करतांना गाव निहाय विकास आरखडा तयार करण्यात येत आहे, तथापि हा आराखडा तयार करतांना त्यात गाव विकासाचे वास्तवदर्शी प्रतिबिंब असणारा आराखडा हवा, अशी अपेक्षा राज्याचे माजी मुख्य सचिव व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी आज येथे ग्राम प्रवर्तकांशी बोलतांना व्यक्त केली.
 ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीकोनातुन गावे सक्षम करण्यासाठी राज्यात राबविले जात आहे. त्या अंतर्गत राज्यातील एक हजार गावे स्वयंपुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यात रायगड जिल्ह्यातील 16 गावांचा समावेश आहे. आज या गावांतील ग्राम प्रवर्तक व जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुखांसह श्री. गायकवाड यांनी आढावा घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  पी.डी. शिगेदार,  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती देवराज, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक शालिक पवार, कौशल्य विकास अधिकारी  सागर मोहिते, ग्राम सामाजीक परिवर्तन अभियान मॅनेजर युवराज सासवडे, स्वदेस फाउंडेशनचे महा व्यवस्थापक तुषार इनामदार, खादी ग्रामोद्योगचे के.डी.कांबळे , मंगेश कीर्तने आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी उपस्थित मान्यवरांचे महाराष्ट्र वार्षिकी हा ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर ग्राम प्रवर्तकांनी आतापर्यंत केलेल्या कामांसंदर्भात सादरीकरण केले.
यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात 16 गावांत हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात  माणगाव तालुक्यातील काकळ, वडगाव, मुठावळी तर्फे तळा,
तळा तालुक्यातील  शेणवली, चरणी खु.,बोरघर हवेली,
श्रीवर्धन तालुक्यातील वाळवती, जासली,
पोलादपूर तालुक्यातील  कापडे खुर्द,  बोरघर, गोवेळे,
म्हसाळा तालुक्यातील  खारसाई, सांदेरी,
महाड तालुक्यातील  बारसगाव, सावने, मोहोत अशा 16 गावांचा समावेश आहे.
यावेळी बोलतांना श्री. गायकवाड म्हणाले की, या अभियानात काम करतांना दिलेल्या उद्दिष्टांप्रमाणे काम करावयाचे आहे. त्यात गावातील प्रत्येक कुटूंबाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावयाचे आहेत.  ग्रामविकास आराखडा तयार करतांना गावाची व्यसनमुक्ती आणि कुटुंब नियोजन यासारख्या सामाजिक निर्देशांचेही पालन करावयाचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांना प्रबोधन देऊन प्रवृत्त करणे आवश्यक आहे. गावातील रोजगारक्षम व्यक्तींना  रोजगारासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणा, गाव पातळीवरील यंत्रणा आणि ग्रामप्रवर्तक यांच्या समन्वयातून गावांचा विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 यावेळी खादी ग्रामोद्योगचे के. डी. कांबळे  यांनी गाव विकास आराखडा तयार करतांना त्यासाठी आवश्यक योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तर केपीएम ॲसेट्स या कंपनीचे  अनिरुद्ध त्रिपाठी यांनी  रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा आराखडा यावेळी सादर केला. त्यासाठी गावातील पर्यटन, कृषि पर्यटन, वन पर्यटन आणि निसर्ग पर्यटन यासारख्या पर्यटनांची सांगड घालुन सोईसुविधांचा विकास आणि  त्यात स्थानिकांचा सहभाग, त्यातून रोजगार निर्मिती व उत्पादन वाढ कशी होऊ शकेल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर करावयाचे ब्रॅन्डींग, मार्केटिंग याविषयी माहिती दिली.  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात रायगड जिल्ह्याला शासनाकडून चांगली मदत व सहकार्य मिळत असून रायगड जिल्हा या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवेल, असा विश्वास व्यक्त केला.
काय आहे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ?
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात परिवर्तन घडविण्यासाठी गावे सक्षम करणे हा या अभियानाचा उद्देश असून बालमृत्यू रोखणे, उत्तम शिक्षण व कौशल्यांचा विकास करणे, सुधारित सिंचन पद्धतीची अंमलबजावणी करणे,  रोजगार निर्मिती करणे, स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा करणे, व्यसनमुक्ती, कुटूंब नियोजन आणि  मुलभूत सुविधांचा विकास या उद्दिष्टांसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.  यासंदर्भात ग्रामविकास विभागाने 29 डिसेंबर 2016 रोजी शासन निर्णयाद्वारे या अभियानाची कार्यपद्धती ठरवली आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा अभियान परिषद स्थापन करण्यात आल्या आहेत.  या अभियानासाठी राज्यातील  खाजगी संस्थांचा आर्थिक व तांत्रिक सहकार्यासाठी सहभाग राहणार आहे. गावातील स्थानिक प्रशासनाला नियोजन प्रक्रियेत मदत करणे,  गाव विकासासाठी उपलब्ध निधीचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी आढावा घेणे,  ग्राम विकास आराखडा तयार करणे, ग्रामस्थांना नियोजनात सहभागी करुन घेणे आदी जबाबदारी ही जिल्हा अभियान परिषदे मार्फत पार पाडली जाईल.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड