आढावा बैठक:मार्च 18 अखेर 21 पुलांची कामे पूर्ण होणार-ना. प्रकाश महेता

अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-  रायगड जिल्ह्यातील 48 जुन्या पुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून  त्यापैकी 21 पुलांची  दुरुस्ती, पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील 7 पुलांची कामे पूर्ण झाले असून  उर्वरित 14 कामे मार्च 2018 पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज येथे व्यक्त केला. ना.महेता यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांच्या प्रगतीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेवाळे,  महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता शेख, कार्यकारी अभियंता तपासे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधिक्षक अभियंता मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक एस. नंदनवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक एम.एन. देवराज, सहाय्यक आयुक्त मत्ससंवर्धन अविनाश नाखवा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पठाण, आत्मा प्रकल्प संचालक एम.एस.डावरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रसाद खैरनार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे  तसेच सार्वजनिक बांधकाम, खार जमिन विभाग यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ना. महेता यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने कामांचा आढावा यावेळी घेतला.  शासकीय योजनांची अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणीही संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या. तसेच होत असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत मंत्रालयस्तरावरील कामांची सूची तयार करुन त्याचा पाठपुरावा करणे, आगामी अर्थसंकल्पात जिल्ह्यातील विविध विकास क्षेत्रांसाठी निधीची मागणी करणे आदी विषयांबाबत ना. महेता यांनी आढावा घेतला.
किल्ले रायगड विकास
किल्ले रायगडाच्या विकासासाठी शासनाने 606 कोटी रुपयांचे पॅकेज दिले असून त्याअंतर्गत  करावयाच्या कामांत  पर्यटकांची गडावर ने आण करण्यासाठी रोप वे सुविधेचा विस्तार, गडाची  मार्गक्रमीका विस्तार व विकास करणे, गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या निगराणीत संवर्धन करणे आदी कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला मार्गदर्शन करण्यासाठी  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातून सेवानिवृत्त सहा अधिकाऱ्यांचे पथक मदत करणार आहे. रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया पुर्णत्वास आली असून काम लवकरच सुरु होईल.
स्वच्छ भारत अभियान
 जिल्ह्यात शहरी भाग 100 टक्के हगणदारी मुक्त झाला आहे.  ग्रामिण भागात 97 टक्के काम झाले असून तीन तालुक्यात अपुर्ण असलेले काम हे लवकरच पूर्ण होऊन या महिन्याअखेर जिल्हा संपुर्ण हागणदारी मुक्त होईल, असा विश्वास यावेळी ना. महेता यांनी व्यक्त केला.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान
 जिल्ह्यात 22 ग्रामपंचायतीमध्ये  मुख्यमंत्री कार्यालयातून नियुक्त ग्रामप्रवर्तक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यामार्फत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे काम सुरु झाले आहे. या कामांनाही गती आली असून त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसतील अशी अपेक्षाही ना. महेता यांनी व्यक्त केली.
मुद्रा, जनधन योजना व प्रधानमंत्री विमा योजना
बॅंकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत शून्य बॅलन्स वर जिल्ह्यात दोन्लाख 20 हजार 628 खाते उघडण्यात आले आहेत.  अटल पेन्शन योजनेअंतर्गत 336 रुपये वार्षिक भरुन  10 हजार 328 लोकांनी खाते उघडले आहे. तर प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेअंतर्गत  एक लाख 3 हजार 492 लोकांनी आपले विमा संरक्षघेतले आहे. तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 3 लाख 5 हजार 24 लोकांनी खाते उघडून संरक्षण घेतले आहे. तर मुद्रा योजनेअंतर्गत 13 हजार 978 लोकांना व्यवसाय उभारण्यासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
आरोग्यसेवा
 जिल्ह्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी  शासन्स्तरावर प्रयत्न सुरु आहेतच. शिवाय जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक संस्था, सार्वजनिक उपक्रमांच्या सामाजिक सहायता निधीतून  यंत्रसामुग्री व अन्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. ज्या रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी बोट ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्र्यांनी कल्पना मांडली असून त्यास मूर्त स्वरुप लवकरात लवकर देण्यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले. या बोट ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णांना तासाभरात मुंबई येथे उपचारासाठी हलवणे सोपे होणार आहे.
पाणीपुरवठा
 जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याच्या योजनांबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. त्यात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जलसंपदा, पाणीपुरवथा विभाग आदी विभागांच्या समन्वयातून कामे करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रस्ते विकास
 जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. त्यासाठी भुसंपादन प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे.  ग्रामिण भागातील रस्ते विकासासाठी   प्रधानमंत्री ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजना प्रत्येकी 90-90 किमी असे एकूण 180 किमी लांबिच्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

 बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक