'विकास संवाद' कार्यशाळा माध्यमे ही शासनाची ज्ञानेंद्रीय- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी




        अलिबाग, जि. रायगड(जिमाका)दि.12- विकास विषयक उपक्रम राबवितांना शासन यंत्रणेला माध्यमे ही योग्य अशा प्रसिद्धीतून आवश्यक प्रतिसाद देत असतात. त्यामुळे शासकीय यंत्रणेला योग्य त्या सुधारणा करण्यास वाव मिळतो; एक प्रकारे माध्यमे ही शासनाची ज्ञानेंद्रीयच आहेत,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित 'विकास संवाद' कार्यशाळेचे आज जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
शासनाच्या विविध विभागांनी गेल्या तीन वर्षात केलेल्या कामगिरीचा आढावा सादर करुन त्यासंदर्भात माध्यमांमधील तज्ज्ञ संपादक, प्रतिनिधी यांच्याशी विचारविनिमय करण्यासाठी आज  जिल्हाधिकारी कार्यालयात 'विकास संवाद' व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या व ज्येष्ठ पत्रकार बलवंत वालेकर हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, कोकण विभागाचे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, सहकार  भारतीचे प्रा.उदय जोशी, अनुलोमचे रवींद्र पाटील,जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव तसेच मान्यवर संपादक व पत्रकार उपस्थित होते. यावेळी शासनाचे विविध विभागांमार्फत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात झालेल्या कामगिरीचा आढावा सादर करण्यात आला.  यावेळी विविध विभागप्रमुखही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. कार्यशाळेच्या उद्देश कथन प्रसंगी ते म्हणाले की, शासन आणि माध्यमे यांच्यातील संवादासाठी अशा कार्यशाळेसारखे उपक्रम उपयुक्त ठरतात. माध्यमांनी चांगल्या योजनांची प्रसिद्धी करून त्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी अन्य विभागप्रमुखांनी उपस्थितांसमोर विभागनिहाय सादरीकरण केले.
आपत्ती व्यवस्थापनात माध्यमांची मोलाची भूमिका- डॉ. बबन जोगदंड

 त्यानंतर दुसऱ्या सत्रात यशदा, पुणे येथील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. बबन जोगदंड यांनी उपस्थित माध्यम प्रतिनिधींना 'आपत्ती व्यवस्थापनात माध्यमांची भूमिका' या विषयावर मार्गदर्शन केले.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जोगदंड म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापनात आलेल्या आपत्तीच्या निवारणातच नव्हे तर आपत्तीची पुर्वसूचना देण्यापासून माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. माध्यमांची भूमिका ही निवारण यंत्रणेला मदतीची असावी जेणे करुन आपत्ती निवारणाचे कार्य हे अधिक सुलभपणे राबविता येऊ शकते.  आपत्ती निवारणात माध्यमांची भूमिका मोलाची असते असे प्रतिपादन यावेळी डॉ. जोगदंड यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, चुकीच्या बातम्या व अफवा पसरवून आपत्तीच्या प्रसंगी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असते. अशा वेळी योग्य व वस्तुस्थितीदर्शक माहिती देण्यात माध्यमे चोख भूमिका बजावतात व आपत्ती निवारण सोपे होते असा आपल्या स्वतःचा अनुभव जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले तर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड