जिल्हा बॅंक समन्वय समिती बैठक रोजगारनिर्मिती क्षेत्राचा पतपुरवठा वाढवा-जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी


अलिबाग, जि. रायगड, दि.5 (जिमाका)-  विविध शासकीय योजनांअंतर्गत स्वयंरोजगार स्थापन करु इच्छिणाऱ्या व त्याद्वारे रोजगार निर्मितीस वाव असणाऱ्या क्षेत्राला बॅंकांनी पतपुरवठा वाढवावा, असे निर्देश आज जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
 जिल्हास्तरीय बॅंक समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. अभय यावलकर, रिजर्व बॅंकेचे मोहन सांगवीकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी भोर, नाबार्डचे एस.एस.रंगवाथन,  जिल्हा अग्रणी बॅंक मॅनेजर ए. नंदनवार,  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती एम.एन. देवराज,  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नित्यानंद पाटील, तसेच सेंट्रल बॅंकेचे पुनितकुमार,  पंजाब नॅशनल बॅंकेचे एस.आर.नलावडे, बॅंक ऑफ बडोदाचे के साई क्रिष्णन,  बॅंक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर  सी.के.पराते, ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक दयानंद कुंभार तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी जिल्ह्यातील बॅंकांचा शासनपुरस्कृत योजनांचा अर्थसहाय्य आढावा घेण्यात आला. तसेच पिक विमा योजना, पिक कर्ज यासाठी  सर्व बॅंकांना दिलेल्या उद्दिष्टांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी  जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडाही सादर करण्यात आला. तसेच शासकीय योजनांअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार प्रकल्पांच्या अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी म्हणाले की, ज्या ठिकाणी अर्थसहाय्य करुन रोजगाराला चालना मिळणार आहे, अशा ठिकाणी अर्थसहाय्य त्वरीत करावे. अशा प्रकरणांचा निपटाराही त्वरीत करुन संबंधित अर्जदाराला उत्तर द्यावे, जेणे करुन उदयोन्मुख उद्योजक हतोत्साहित होणार नाही याची बॅंक अधिकाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात  ग्रामप्रवर्तकांनी  गावातील रोजगार निर्मितीसाठी गावातील काही लोकांना शेतीपुरक व स्थानिक उद्योगांसाठी प्रवृत्त केले आहे. अशा प्रकरणांबाबत मुदतीत व सकारात्मक निर्णय घ्यावा, जेणे करुन स्थानिक लोकांना त्याच गावात रोजगार उपलब्ध होईल. बॅंकांनी स्वयंप्रेरणेने गावकऱ्यांमध्ये अर्थसहाय्य योजनांबाबत जागृती करण्यासाठी शिबीरे घेतली पाहीजे.  लोकांपर्यंत पोहोचून त्यांना योजनांचा लाभ दिला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. दयानंद कुंभार यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक