कर्जत उपजिल्हारुग्णालयास सर्व सुविधांची पुर्तता करु- राज्यमंत्री ना. देशमुख


अलिबाग,जि. रायगड, दि.5 (जिमाका)- कर्जत उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधांची पुर्तता करुन स्थानिक आदिवासी व अन्य दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे  प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात आयोजित बैठकीत केले.
            बैठकीला माजी आमदार देवेंद्र साटम, आरोग्य विभागाच्या उपसंचालिका श्रीमती रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन चव्हाण, डॉ.रामकृष्ण पाटील, विविध विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरीक उपस्थित होते.
            ना. देशमुख पुढे म्हणाले की, येथील रिक्त पदे भरुन कामकाजात सुसुत्रता आणणे, दुर्गम भागातील लोकांना वेळेवर उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याच्या एक्सरे मशिन सुस्थितीत ठेवण्याच्या, पुरेसा औषधसाठा ठेवणे, कोल्ड स्टोरेज सुसज्ज करणे, सर्पदंशाची लस 24 तास उपलब्ध करणे आदी सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. तत्पूर्वी मंत्री महोदयांनी स्थानिक नागरीकांच्या समस्या जाणून घेवून त्या समस्यांचे निराकरण केले.
प्रारंभी उपसंचालिका श्रीमती रत्ना रावखंडे यांनी स्वागत केले तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी रुग्णांलयातील सुविधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची मंत्री महोदयांनी भेट घेवून विचारपूस केली. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी, परिचारीका उपस्थित होत्या.
कर्जत येथील आगाराची पाहणी
कर्जत येथील राज्य परिवहन मंडळाचे एस.टी. आगार व कार्यशाळेची पाहणी केली. तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची माहिती घेवून त्या समस्या सोडविण्याबाबत विभाग नियंत्रक विजय गिते यांच्या बरोबर चर्चा करुन समस्या सोडविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रारंभी विभाग नियंत्रक विजय गिते यांनी मंत्री महोदयांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी कर्जत एस.टी. आगारातील अधिकारी, कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक