मतदान याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018: मतदार नोंदणी व पडताळणीसाठी 15 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरोघरी भेटी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- भारत निवडणूक आयोगाने मतदान याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018 घोषित केला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी करुन  मतदार यादी अचूक होण्यासाठी व मतदार नोंदणीविषयक चांगल्या सुविधा देण्यासाठी  15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ) हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करणार आहेत.  तसेच या कालावधीत 1 जानेवारी 2018 या दिवशी ज्यांच्य वयाची 18 वर्षे पुण होत आहेत अशा नवमतदारांचीही नोंदणी केली जाणार आहे. या मोहिमेत नागरिकांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करुन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी  केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदान याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2018 घोषित केला आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील पनवेल,कर्जत,उरण,पेण,अलिबाग,श्रीवर्धन, महाड या विधानसभा मतदारसंघाच्या प्रारंप मतदार याद्यांची प्रसिद्धी दि.3 ऑक्टोबर 2017 रोजी करण्यात आली आहे. तथापि हा कार्यक्रम दि.30 नोव्हेंबर 2017 पर्यंत सुरु ठेवावा असे निर्देश भारत निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झाले आहेत.त्यानुसार आता 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत नाव नोंदणी संदर्भात दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात स्विकारण्यात येणार आहेत. ज्यांचे वय 1 जानेवारी 2018 रोजी 18 वर्षे पुर्ण होत आहे अशा नवमतदारांची नोंदणी ही या मोहिमेत होणार आहे.
मतदार  नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना नमुना सहामधील अर्ज तसेच दुबार, स्थलांतरीत मतदारांना, मयत मतदारांच्या नातेवाईकांना मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमूना सातमधील अर्ज, मतदार यादीतील चुका दुरुस्तीसाठी नमुना आठ मधील अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील.
जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी होण्यासाठी, मतदार यादी अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदार नोंदणीविषयक चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी  15 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बिएलओ)    हे घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी व नोंदणी करणार आहेत. पूर्वीच्या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार यादीत नाव नोंदणीपासून वंचित राहिलेल्या पात्र नागरिकांना नमुना सहाचे वाटप करणे व त्यांच्याकडून परत घेणे व जमा करणे. मतदार नोंदणीसाठी पात्र होणाऱ्या नागरिकांची माहिती जमा करणे. स्थलांतरीत व मयत मतदारांच्या वगळणीसाठी नमुना आठचे वाटप करणे व जमा करणे.मतदारांचे मोबाईल व दुरध्वनी क्रमांक गोळा करणे, मोबाईल आज्ञावलीचा वापर करुन मतदारांच्या घरांचे अक्षांश व रेखांश गोळा करणे,दुबार मतदारांना सुचना बजावणी करणे,पंचनामा करणे, मतदार यादीत फोटो नसलेल्या व कृष्णधवल फोटो असलेल्या मतदारांची नजिकच्या काळातील फोटो मतदारांनकडून प्राप्त करुन घेणे इत्यादी कामे केली जाणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत वगळण्यात येणाऱ्या मतदारांच्या नावांची यादी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार कार्यालयात उपलब्ध आहे, असे  उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक