जिल्हा ग्रंथोत्सव 201:नायगावकरांच्या मिश्किल कविता आणि हास्यरसात डुंबलेले अलिबागकर



अलिबाग, जि. रायगड, दि.23(जिमाका)- जिल्हा ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ज्येष्ठ कवी अशोक  नायगावकरांच्या मिश्किली आणि कविता या काव्य मैफिलीत सादर झालेल्या  मिश्किल कवितांनी अलिबागकर रसिक हास्यरसात डुंबले. मिश्किल कवितांतून आणि निवेदनातून नायगांवकरांनी गुदगुल्या आणि चिमटे घेत कवितांची पखरण केली. कवितांच्या या मैफिलीतून दैनंदिन जीवनातील समस्यांकडे मिश्किलपणे पहात जीवन सुसंवादी आणि आनंददायी करण्याचा संदेशही कवी नायगांवकर यांनी अलिबागकर रसिकांना दिला,
 येथील जेएसएम महाविद्यालयाच्या सभागृहात दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सायंकाळी ही काव्य मैफिल रंगली. यावेळी लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांनी  कवी नायगांवकर यांचा परिचय रसिकांना करुन दिला. ज्येष्ठ साहित्यीक ॲड. विलास नाईक यांच्या हस्ते पुस्तक देऊन कवी नायगांवकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री. नायगांवकर यांनी आपल्या काव्य कथनास सुरुवात केली. आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात खूप कवि कल्पना सुचू शकत नाहीत. त्यामुळे जीवन जगतांना ही मिश्किलता कामी येते. याचे अनेक दाखले देत नायगांवकरांनी उपस्थितांना हसवले.  हळुवार म्हणजे हळू केलेला वार असतो, तिळगुळ देणं हे सुद्धा वादाचे कारण होऊ शकते. आणि सुर्याकडून अंधार पडायच्या आत घरी पोहोचायचे हे आपण शिकलो अशा एकाहून एक भन्नाट  शाब्दीक कोट्या करीत अलिबागकर रसिकांना हसवले. टिळकांशी संवाद या कवितेने रसिकांना अंतर्मूखही केले. तेव्हा आणि आता या कवितेतून महिला वर्गाच्या  सोशिक जीवनाच्या वेदना मांडतांना रसिक हळवे झाले. स्वयंपाकघर हा नायगांवकरांचा आवडता प्रांत. त्यात त्यांनी रसिकांना सफर घडवली. भाजले जाणारे वांगे, कापले जाणारे कांदे आणि तत्सम भाजीपाल्याच्या वेदना ऐकून रसिक मनमुराद हसले.  स्वयंपाकघरात चकलीचे क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज असे दोन प्रकारही त्यांनी सांगितले. उजवे डावे या कवितेतून  शरीराच्या उजव्याकडून डाव्या भागाचे  होत असलेले शोषण चितारुन रसिकांना हसत हसत अंतर्मूख केले. एकूणच नायगांवकरांची काव्य मैफिल रसिकांना मनमूराद हसवणारी ठरली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक