जिल्हा ग्रंथोत्सव 2017: आजपासून दोन दिवसीय ग्रंथोत्सव

अलिबाग, जि. रायगड, दि.21(जिमाका)- रायगड जिल्ह्याचा शासकीय ग्रंथोत्सव बुधवार दि.22 व  गुरुवार 23 नोव्हेंबर या दोन दिवसांत आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यास नामांकीत कवी अशोक नायगावकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून त्यांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रमही रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. ग्रंथप्रेमी वाचक व विद्यार्थ्यांनी या ग्रंथोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, सदर दोन दिवसीय कार्यक्रम जेएसएम महाविद्यालय, अलिबाग येथील सभागृहात होणार आहे.
बुधवार दि.22 रोजी कान्होजी आंग्रे समाधिपासून सकाळी 9 वा. ग्रंथ दिंडी आयोजित करण्यात आली आहे.  यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथ पूजन होईल. तर यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील व  सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.गौतम पाटील  यांची उपस्थिती राहणार आहे. ग्रंथदिंडी कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर सकाळी 11 वा.मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल. त्यानंतर उद्घाटन सत्र होऊन ग्रंथोत्सवास विधीवत प्रारंभ होईल. या सोहळ्याचे नियोजित अध्यक्ष केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते हे आहेत. उद्घाटन राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. प्रकाश महेता यांच्या हस्ते होईल.  या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक नायगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आमदार सर्वश्री जयंत पाटील, सुनिल तटकरे, अनिल तटकरे,  निरंजन डावखरे, बाळाराम पाटील, विधानसभा सदस्य आमदार सर्वश्री सुभाष पाटील,  सुरेश लाड, भरत गोगावले, धैर्यशील पाटील,  प्रशांत ठाकूर,  मनोहर भोईर,  अवधूत तटकरे तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी , ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, सहाय्यक ग्रंथालय संचालक कोकण भवन श्रीमती शालीनी इंगोले यांचीही या सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे.
त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता  इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी  ' माझे आवडते पुस्तक' या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा होईल. तर अलिबागकर काव्यरसिकांसाठी सायंकाळी सहा वाजता कवी अशोक नायगावकर यांच्या ' मिश्किली आणि कविता' ही काव्य मैफिल होईल.
गुरुवार दि.23 रोजी सकाळी 11 वा. 'ग्रंथांनी मला काय दिले?' या परिसंवादात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पोलिस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, जिल्हा कोषागार अधिकारी फ़िरोज मुल्ला, पेण येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड हे अधिकारी आपल्या अधिकारी  होण्याच्या प्रवासात पुस्तकांच्या योगदानाबद्दल अनुभव सांगतील.  त्यानंतर दुपारच्या सत्रात दुपारी साडेतीन वा. मैत्र फाऊंडेशनच्या वतीने 'समाज विकास व वाचनसंस्कृती' या विषयावर पथनाट्य सादर होईल. गुरुवारी दुपारी चार वा. 'माध्यमे आणि वाचनसंस्कृती' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवादाचे अध्यक्ष  कोकण विभागीय  माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे हे असतील. तर या परिसंवादात दैनिक कृषीवल चे संपादक प्रसाद केरकर, दैनिक पुढारी चे संपादक शशीकांत सावंत, दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप,  दैनिक लोकसत्ताचे हर्षद कशाळकर, सुधागड एज्युकेशन  सोसायटी, कुरुळ  येथील मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता पाटील  तसेच मान्यवर माध्यम प्रतिनिधी आपले विचार व्यक्त करतील. समारोपाच्या सत्रात सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांच्या हस्ते  पारितोषिक वितरण होईल.

या दोन दिवसीय ग्रंथोत्सवास रायगड जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी तसेच सदस्य सचिव जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक