जिल्हा ग्रंथोत्सव 2017 :पुस्तकांमुळे माणसे वाचणेही शिकलो- जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी







अलिबाग, जि. रायगड, दि.23(जिमाका)- पुस्तक वाचनातून आपण समरसता अनुभवू लागतो. दुसऱ्याला जाणून घेण्याची हीच प्रक्रिया असते.  हे केवळ वाचनातुन शक्य होते. त्यामुळेच पुस्तक वाचता वाचता माणसेही वाचायला शिकलो, ज्याचा फायदा मला जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना होतो. येणाऱ्या अभ्यागतांना वाचणे सहज शक्य होते, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी 'ग्रंथांनी मला काय दिले?' या विषयावर आपले विचार व्यक्त केले.
जिल्हा ग्रंथोत्सवाच्या कार्यक्रमात आज सकाळी जेएसएम महाविद्यालयात 'ग्रंथांनी मला काय दिले?' या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी हे या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी होते. या परिसंवादात अप्पर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, जिल्हा कोषागार अधिकारी फिरोज मुल्ला, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी आपले विचार व्यक्त केले.  यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी उपस्थित होते.
 या परिसंवादात बोलतांना जिल्हा कोषागार अधिकारी मुल्ला म्हणाले की,  शासनाचे काम करतांना विविध नियमांचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी  वाचनाची सवय ही कामी येते.  चांगलं वाचन आवश्यक असून वाचनाने आपला दृष्टीकोन बदलतो.  आपले विचार अधिक व्यापक झाले. वाचनाने माझी   दृष्टी अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक झाली. माझा सामाजिक आणि आर्थिक स्तर केवळ वाचनामुळेच वाढला. माझ्या कुटूंबाला असलेला व्यसनाधिनतेचा शापही मी वाचनामुळेच मोडीत काढू शकलो.
अपर पोलिस अधिक्षक संजयकुमार पाटील म्हणाले की,  वाचनाचा संस्कार आवश्यक आहे. वाचनामुळे माझा धर्म आणि धार्मिकता याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे मला पोलीस विभागात काम करतांना मदत होते. पुस्तके ही आपल्या व्यक्तीमत्व विकासात  मोलाची मदत करतात. ज्ञान माहितीचा साठा वाढला आहे. त्याचा अधिकाधिक वापर करण्यासाठी वाचनाची आवड आवश्यक असल्याचे प्रतिपादन पाटील यांनी केले.
 प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने म्हणाले की,  पुस्तके वाचनाची लहानपणापासून सवय जडणे आवश्यक आहे. त्यासाठी आई वडील हे मोलाची भूमिका बजावतात. शिक्षक मार्गदर्शन करतात.  पुस्तकांमुळे आज मला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्येचे निराकरण करणे शक्य होते. पुस्तके ही मनाची मशागत करतात. त्यामुळे  समाज प्रगल्भ व प्रगतीशिल होतो.
आपल्या अध्यक्षीय समारोपात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  लहानपणी वडिलांमुळे वाचनाचा संस्कार घडला. मृत्युंजय हा पहिला ग्रंथ वाचून मी भारावून गेलो. त्यासाठी लेखक शिवाजी सावंत यांना पत्रही लिहिले. त्यांनीही मला उतर दिले. ते पत्र मी जपून ठेवले आहे. पुढे अधिकारी झाल्यावर मला   शिवाजी सावंतांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांना ते पत्र दाखवले. आपल्या आयुष्यात शिवाजी सावंत  आणि कुसुमाग्रज यांनी त्यांच्या स्वाक्षरीसह दिलेले पुस्तक हाच अनमोल ठेवा आहे.  लहानपणी चांदोबा आणि किशोर हे मासिक मित्रांसोबत भागिदारीत वाचल्याची आठवणही त्यांनी सांगितली.  आत्ताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात  विविध गॅजेट्स उपलब्ध असतांना  पुस्तक वाचनाचा आनंद काही औरच आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुस्तकांमुळे आपले विचार सर्वसमावेशक होतात. इतिहास आणि संस्कृतीचे यथार्थ आकलन होते. वृत्तपत्र वाचन हे  वाचनाची आवड निर्माण करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.  वाचनामुळे मनः शांती मिळते.  गावा गावात ग्रंथचळवळ पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात किमान 500 ग्रंथ असावेत अशी संकल्पना राबविण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे सुधीरशेट यांचा महाड येथे राबविण्यात येत असलेल्या पुस्तक बाग उपकमाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मतदार ओळखपत्र वाटप
याच कार्यक्रमात वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्रे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी  ओंकार अशोक थळे, प्रज्ञा जनार्दन थळे,  सुशिल संदेश म्हात्रे,  श्रीनाथ पंधरीनाथ पाटील, प्रफुल्ल  कुले या विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात मतदान ओळखपत्रे वाटप करण्यात आले. यावेळी   अलिबागचे तहसिलदार प्रकाश सकपाळ उपस्थित होते.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन  सुधीर शेट यांनी केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक