रायगड जिल्हा ग्रंथोत्सव 2017 :माध्यमे वाचनसंस्कृती संवर्धनासाठी पुरकच- डॉ. गणेश मुळे




अलिबाग, जि. रायगड, दि.24(जिमाका)- वाचनाची माध्यमे बदलली आहेत. परंतू वाचन हे अक्षरांशी संबंधित आहे; आणि अक्षरे शाश्वत आहेत. त्यामुळे वाचन संस्कृती टिकणार, असे ठाम प्रतिपादन कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी आज येथे केले.
जिल्हा ग्रंथोत्सवात आज आयोजित माध्यमे आणि वाचन संस्कृती या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. मुळे बोलत होते. यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशीकांत सावंत, दैनिक लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक जयंत धुळप, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अलिबागच्या अध्यक्ष सुजाता पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध.बा. वळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 या परिसंवादात बोलतांना सुजाता पाटील म्हणाल्या की, लेखन कलेमुळे शब्द चिरंतन झाले. लिहिलेले वाचले जाऊन वाचन संस्कृति विकसित झाली.  माध्यमांमध्ये बदल होत असला तरी वाचन संस्कृती मात्र टिकून आहे. तरीही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी वाचनसंस्कृतीवर पहिले आक्रमण केले.  अलिकडच्या समाजमाध्यमांमुळे लेखक आणि वाचक यांच्या दरम्यान असणारे अंतर कमी झाले आहे, शिवाय वेळही कमी झाला आहे.  त्यामुळेच आता डिजीटल दिवाळी अंक निघू लागले आहेत.  तथापि माध्यमे बदलली असली तरी  वाचन मात्र कायम राहिल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जयंत धुळप म्हणाले की, आता माध्यमे अधिक सोपी झाली असून  त्यामुळेच वापर करतांना समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.  वाचक किंवा प्रेक्षकांना आवडेल ते  देण्याकडे माध्यमांचा कल वाढल्याने विचार मर्यांदांच्या चौकटीला मर्यादा येत चालल्या आहेत. त्यामुळे माध्यमांची विश्वासार्हता वाढवणे हे  माध्यमात काम करणाऱ्यांची जबाबदारी आहे, असे मत धुळप यांनी व्यक्त केले.
यावेळी शशीकांत सावंत सांगितले की, वाचनाची गोडी लावण्याच्या दृष्टीने मातृभाषेतून शिक्षण ही महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी पालकांनी मुलांना मातृभाषेतून शिक्षण देणे आवश्यक आहे.  माध्यमे बदलल्यामुळे वाचन संस्कृतीवर काहीही परिणाम होत नाही. कारण सर्वच वर्तमान पत्रांच्या ई- आवृत्त्यांचे वाचक दिवसेंदिवस वाढत आहेत, असे त्यांनी सांगितले.
 आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. मुळे म्हणाले की,  माध्यमे ही परस्परांना पूरक असतात. ती कधीही एकमेकां चे अस्तित्व मिटवत नाहीत.  माध्यमांचा वापर करतांना माहिती  ही खात्रीशीर असली पाहिजे याची खात्री माध्यम वापरणाऱ्याला हवी असते. माध्यमांची विश्वासार्हता ही  वाचनसंस्कृती टिकविण्यासाठी आवश्यक आहे, असे मतही डॉ. मुळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले तर आभार ध.बा. वळवी यांनी मानले.
पारितोषिक वितरणाने समारोप
वाचनाने माणूस समृद्ध होतो- सुनिल जाधव
 वाचन ही माणसाला समृद्ध करणारी प्रक्रिया आहे. वाचन करणे हे स्पर्धेच्या युगात खूप हिताचे आहे. याठिकाणी आयोजित स्पर्धेच्या निमित्ताने वाचनाची सवय जोपासणारे विद्यार्थी हे कौतूकास पात्र आहेत, अशा शब्दात जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी  ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील  विजेत्या स्पर्धकांचे कौतूक केले. जिल्हा ग्रंथोस्त्सव कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी श्री. जाधव उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
दुपारच्या सत्रात मैत्र फाऊंडेशनच्या वतीने 'समाज विकास व वाचन संस्कृती' याविषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचा समारोप हा वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्रे व  विजेत्यांना पारितोषिके वितरीत करुन करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ध. बा. वळवी, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष नागेश कुलकर्णी,  रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे विश्वस्त प्रकाश पाटील,  रायगड जिल्हा मराठी अध्यापक मंडळाचे सचिव विपीन राऊत, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष संजय भायदे  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहभागी स्पर्धकांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी विजेते स्पर्धक व सहभागींचे कौतूक करुन त्यांना प्रोत्साहन दिले. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तांत्रिक सहाय्यक अजित पवार यांनी केले. या आयोजनासाठी  जिल्हा ग्रंथालय संघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी, सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल अलिबाग येथील कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक