जिल्ह्यात 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख रुपयांची कर्जमुक्ती

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017
अलिबाग,(जिमाका)दि.12- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत जिल्ह्यातील 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख  9 हजार 846 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात 934 शेतकरी हे कर्जमाफी अंतर्गत तर 10 हजार  शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. तो शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात ( कर्जमाफी) व बचत खात्यात  ( प्रोत्साहनपर) वर्ग करण्यात आला आहे.
            यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत प्राप्त माहिती अशी की,  शासनाकडून प्राप्त ग्रीन यादीनुसार, जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत  कर्ज घेतलेले 54 शेतकरी होते.  या शेतकऱ्यांना एकूण 27 लाख 14 हजार 544 रुपयांचे कर्ज देण्यात आले होते, जे थकीत होते.  तर नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ द्यायचा होता अशा शेतकऱ्यांची संख्या 9723 इतकी असून त्यांना द्यावयाच्या लाभाची रक्कम  13 कोटी 53 लाख 13 हजार 302 रुपये इतकी आहे.  रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत एकूण 9777 शेतकऱ्यांना 13 कोटी  80 लाख 27 हजार 846 रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली. या रकमा बॅंकेने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्या आहेत.
            राष्ट्रीयकृत बॅंकांमार्फत जिल्ह्यात 880 शेतकऱ्यांना 5 कोटी 27 लाख 19 हजार रुपये इतक्या रकमेचे कर्ज देण्यात आले होते. हा लाभ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या  283 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 53 लाख 63 हजार रुपये देण्यात आले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक पांडुरंग खोडका यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 10 हजार 940 शेतकऱ्यांना  19 कोटी 61 लाख 9 हजार 846 रुपयांचा लाभ या योजनेमुळे मिळाला आहे.
अशी योजना असा लाभ
राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. तसेच 2015-16, 2016-17  या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली, अशा शेतकऱ्यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले होते. 2009- 10 ते 2015- 16 या कालावधीत कर्जाचे पुनर्गठन केलेले शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी 30 जून 2016 रोजी थकबाकीदार असतील त्यांनाही वरील योजनेचा लाभ देण्याचे घोषित करण्यात आले होते.
शासन निर्णयानुसार जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या रायगड जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी राज्य शासनाने पुरविलेल्या कॉलम 1 ते 66 नमुन्याप्रमाणे ऑनलाइन माहिती भरुन दिली होती. त्यानुसार रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज घेतलेल्या रायगड जिल्ह्यातील 9 हजार 777 शेतकऱ्यांना  तर राष्ट्रीयकृत बँकांच्या खातेदार 1 हजार 163 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
 महाकर्जमाफी राज्यस्तरावरील चित्र-
 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग.
 या योजनेंतर्गत 77 लाख अर्ज प्राप्त. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु. त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित.
 जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेणार. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल.
रायगड जिल्ह्यातील महाकर्जमाफी दृष्टीक्षेपात-
·         छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात  10 हजार 940 शेतकऱ्यांना लाभ.
·         जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमार्फत (थकबाकीदार व प्रोत्साहनपर)  लाभ मिळालेले शेतकरी 9777.
·         वाटप झालेली रक्कम 13 कोटी 80 लाख 27 हजार 846 रुपये.
·         राष्ट्रीय कृत बॅंकांमार्फत 1163 शेतकऱ्यांना 5 कोटी 80 लाख 82 हजार रुपयांच्या रकमेचा लाभ

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक