जिल्हा नियोजन समिती बैठक :सन 2018-19 चा जिल्हा विकास आराखडा मंजूर





अलिबाग,जि. रायगड, दि.2,(जिमाका)- जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2018-19 या आर्थिक वर्षा करीता  रायगड जिल्ह्यासाठी 174 कोटी 70 लक्ष रुपयांच्या विकास आराखड्यास आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस मान्यता देण्यात आली. राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे पालकमंत्र्यांनी स्वागत केले.
जिल्हा नियोजन समितीची सभा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे गृहनिर्माण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, विधानपरिषद सदस्य आ. जयंत पाटील, विभासभा सदस्य आ. सुरेश लाड, आ. भरत गोगावले, आ. सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, आ. धैर्यशिल पाटील, आ. मनोहर भोईर, आ. प्रशांत ठाकुर, जि.प. उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील तसेच जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  अप्पर जिल्हाधिकारी  भरत शितोळे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी  जगन्नाथ भोर, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
2018-19 च्या आराखड्यास मंजूरी
यावेळी सन 2018-19 साठीचा जिल्हा विकासाचा जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा सादर करण्यात आला. त्यात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत 174 कोटी 70 लक्ष रुपयांचा आराखडा असून विशेष घटक योजनेअंतर्गत 24 कोटी 66 लक्ष 75 हजार रुपये व आदिवासी उपयोजनेसाठी 55 कोटी 95 लक्ष  34 हजार रुपयांचा असा एकून 255 कोटी 32 लक्ष 9 हजार रुपयांचा आराखडा मांडण्यात आला.
*ग्रामिण रस्त्यांसाठी भरीव तरतूद*
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामिण भागातील रस्त्यांची कामे, साकव कामे तसेच रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी 33 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तर शाळा दुरुस्तीसाठी 2 कोटी, आरोग्य सुविधा, दवाखाने आदींसाठी 8 कोटी रुपये तर पशुसंवर्धन विभागासाठी 3 कोटी रुपये, वन विभागासाठी 13 कोटी  तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कार्यालये बांधणे, गावांत स्मशानभूमि बांधणे आदींसाठी 7 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विकासकामांसंदर्भात येत असलेल्या अडचणी व प्रश्नांसंदर्भात लवकरच एक सर्वसमावेशक बैठक घेण्यात येईल, असे ना. महेता यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या सभेत विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन भवनाचे काम 31 मार्चपुर्वी पूर्ण करण्याचे निर्देश
जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले जिल्हा नियोजन भवनाचे काम 31 मार्च पर्यंत पूर्ण करुन  नियोजन भवन कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देशही पालकमंत्री ना. महेता यांनी दिले.
तीन पर्यटन स्थळे ब वर्गात समाविष्ट करण्यासाठी ठराव
 जिल्ह्यातील शिवथरघळ ता. महाड, मुरुड, आणि विन्हेरे ता. महाड येथील झोलाई देवस्थान या पर्यटनस्थळांचा ब वर्ग पर्यटन स्थळांत समावेश करण्यात यावा असा ठराव मंजुर करुन तो शासनाकडे पाठविण्यात आला.
'महाराष्ट्र वार्षिकी 'देऊन नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत
आजची बैठक ही जिल्हा नियोजन समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची  पहिलीच बैठक होती.  या सर्व सदस्यांचे स्वागत गुलाबपुष्प व महाराष्ट्र वार्षिकी हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने प्रकाशित केलेले पुस्तक देऊन करण्यात आले. यावेळी ना. महेता म्हणाले की, नवनिर्वाचित सदस्यांनी हे पुस्तक वाचावे, जेणे करुन या अभ्यासपूर्ण पुस्तकातील माहितीचा उपयोग सदस्यांना जिल्ह्याच्या नियोजनात योगदान देतांना होईल.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक