महामार्गावरील अवजड वाहतूक 29 ते 31 डिसेंबर दरम्यान बंद : जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश



अलिबाग, जि. रायगड, दि.26- रायगड जिल्ह्यात जादा पर्यटक येण्याची शक्यता लक्षात घेता, येत्या 29 ते 31 डिसेंबर (शुक्रवार ते रविवार) दरम्यान जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवरील रहदारी सुरळीत ठेवून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या. या कालावधीत जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
नुकत्याच दि. 23 ते 25 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा ओघ वाढल्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांची तात्काळ बैठक बोलावून पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सरक, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी डी.एच. पाटील, सहाय्यक बंदर निरीक्षक पी.एम. राऊळ आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, येत्या 29 डिसेंबर पासून पुन्हा पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता लक्षात घेता, महामार्गावरील अवजड वाहतूक 31 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्यात यावी. त्याचे संपुर्ण नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी व वाहतुक पोलिसांनी करावे. वाहतुकीच्या कोंडीस कारणीभूत ठरणारे महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे.
समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सागरी किनाऱ्यांवर सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत जीवरक्षकांची पथके तैनात करण्यात यावीत. तसेच पर्यटकांची ने आण करणाऱ्या बोटी व साहसी खेळांसाठी वापरण्यात येणाऱ्या स्पीड बोट यांवर प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी बसविण्यात येऊ नये, यावर बंदर निरीक्षकांचे पथक गस्त घालून लक्ष ठेवेल. तसेच प्रवाशांना जीवरक्षक उपकरणे परिधान केल्याशिवाय साहसी खेळांकरीता प्रवेश देऊ नये, या सर्व बाबींचे कटाक्षाने पालन करण्यात यावे, अशा सुचना डॉ. सूर्यवंशी यांनी केल्या.
जिल्ह्यातील किल्ल्यांवरही मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. काही त्या ठिकाणी रात्री मुक्कामीही असतात. अशा सर्व प्रवाशांचे सामान तपासूनच त्यांना वर जाण्याची परवानगी देण्यात यावी. प्रवाशांच्या सोबत मद्याच्या बाटल्या वगैरे आक्षेपार्ह वस्तू आढळल्यास त्या जप्त करण्याची कारवाई करावी, जेणे करुन किल्ल्यांचे पावित्र्य जपले जाईल. या काळात वाहतुक नियमन करुन प्रवाशांचा प्रवास सुखरुप होईल याकडे लक्ष पुरविण्यात यावे,असे निर्देशही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक