छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजन:आर्थिक संकटातून झाली कुटूंबाची मुक्तता



अलिबाग, जि. रायगड,दि.15 (जिमाका)-  शेताची बांधबंदिस्ती करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कर्ज घेतलं. फेडण्याचे प्रयत्न सुरु होते. पण अतिवृष्टीमुळे शेताची केलेली बांधबंदिस्तीही वाहून गेली. पिकाचं नुकसान झालं. सोसायटीचं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी समस्या निर्माण झाली. कर्जाच्या बोजामुळे कुटूंबावर आर्थिक संकट ओढवल्याची परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळी शासन मदतीला धावून आलं, कर्जमाफी झाली आणि  शासनाच्या निर्णयामुळे संपुर्ण कुटूंबाची आर्थिक संकटातून मुक्तता झाली.
हे भावोद्गार आहेत, सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांचे. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख  9 हजार 846 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यातील मधुकर पाटील हे एक. आज त्यांचे कुटूंब कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्याचा मोकळा श्वास घेत आहे.
अलिबाग सारळ येथील शेतकरी मधुकर पाटील यांनी त्यांच्या 1 एकर शेतीमध्ये ओम-3 व जया ही भाताची बियाणे पेरली होती.  शेताच्या बांधबंदिस्ती करण्यासाठी त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या हाशिवरे शाखेतून सन 2015-16 मध्ये 2 लाख 70 हजार रुपये इतके कर्ज घेतले होते.  पण निसर्गाची अवकृपा झाली, अतिवृष्टीमुळे बांधबंदिस्ती वाहून गेली. त्यामुळे शेतामध्ये पेरलेली भाताची बियाणे कुजली. अपेक्षित उत्पादन बुडाले. त्यामुळे पाटील यांना मोठे आर्थिक नुकसान झाले. भाताचे पिक वाया गेले.  एकीकडे कर्जाचा बोजा आणि दुसरीकडे अपेक्षित उत्पन्न न झाल्याने कुटूंबाची आर्थिक स्थिती खचली आणि सोबत मनोधैर्यही. परंतू  जिद्दीने या स्थितीचा सामना सुरु होता. कर्जफेडीचे प्रयत्न सुरु होते.
 नुकतेच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत 1 एप्रिल, 2009 ते 30 जून, 2016 अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत कर्जमाफी व 1 लाख 50 हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. तसेच 2015-16, 2016-17 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली अशा शेतकऱ्यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले. यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला व तो शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात (कर्जमाफी) व बचत खात्यात (प्रोत्साहनपर) वर्ग करण्यात आला.
मधुकर पाटील यांनी त्यांच्या 2 लाख 70 हजार पैकी 48 हजार रुपये कर्ज फेडणे बाकी होते. शासनाने हा कर्जमाफीचा निर्णय घेतल्याने त्यांच्या उर्वरित 48 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. शासनाने हा एक चांगला निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक दिलासा मिळाला असून आर्थिक संकटातून कुटुंबाला हातभार लागला आहे. आता हे कुटूंब नव्या उमेदीने आपल्या काळ्या आईची सेवा करण्यास सज्ज झाले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक