जागतिक मृदा दिवस : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण



        अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5- जागतीक मृदा दिनाचे औचित्यसाधून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत जमिन आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ व मार्गदर्शनाचा कार्यक्रम अलिबाग तालुक्यातील आंबेपूर येथे  आमदार सुभाष पाटील यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले.
              रायगड जिल्हयात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत सन 2017-18 मध्ये जमिन आरोग्य पत्रिका कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिका देण्याकरीता जिल्हयातील 978 गावांतून 16500 माती नमुने गोळा करण्यात आले आहेत. त्यामध्ये 163264 शेतक-यांना जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद तपासणीवर आधारीत, अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतूलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे, जमिन सुपिकता निर्देशांक तसेच पिक अन्नद्रव्य वापराच्या शिफारशीसह शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे.
                  जमिनीचे आरोग्य व सुपिकता दिर्घकाळ टिकवुन ठेवण्याकरीता तिचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे यासाठी माती परिक्षणासारख्या प्रभावी तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देशात सन 2015-16 पासून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृद आरोग्य पत्रिका वितरण कार्यक्रम सुरु केलेला आहे. या कार्यक्रमाची प्रथम सायकल (सन 2015-17) मार्च 2017 मध्ये पुर्ण झालेली असून दुसरी सायकल (सन 2017-19) माहे एप्रिल 2017 पासून सुरु झालेली आहे. या कार्यक्रमात टप्प्याटप्प्याने आगामी दोन वर्षांच्या कालावधीमध्ये सर्व गावांची निवड करुन सर्व शेतक-यांना त्यांच्या शेतजमिनीची आरोग्य पत्रिका देण्यात येत आहेत.
               मृद नमुन्यांचे मृद चाचणी प्रयोगशाळेत परीक्षण केल्यानंतर शेतकयांना आरोग्य पत्रिका देण्यात येते. आरोग्य पत्रिकेमध्ये जमिनीतील उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश यांसारखी मुख्य घटक सल्फर यांसारखे दुय्यम घटक व जस्त, लोह, मंगल, तांबे व बोरॉन यासारख्या सुक्ष्म मुलद्रव्यांचे प्रमाण समजणार आहे. याबाबतच्या माहितीचा उपयोग विविध पिकांना योग्य प्रमाणात संतुलित खते वापरण्याकरीता करता येणार आहे.
                पिकांच्या चांगल्या वाढीसाठी एकूण 17 प्रकारच्या अन्नद्रव्यांची गरज असते. ही सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय खतातून पिकांना उपलब्ध होतात. परंतु त्यांचे प्रमाण सेंद्रिय खतामध्ये अत्यंत कमी असल्याने फार मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांची मात्रा द्यावी लागते. शेणखत, कंपोस्ट खत, लेंडी खत, गांडूळ खत, करंज पेंड, निम पेंड यासारखी सेंद्रिय खते, ताग, धैंचा, गिरीपुष्प यांसारखी हिरवळीची खते ऍ़झोटोबॅक्टर, रायझोबियम यासारखी नत्र स्थिरीकरण करणारी जीवाणू खते यांचा नियमित वापर करणे आवश्यक आहे.
             माती परीक्षणानुसार खतांचा संतुलित व एकात्मिक पद्धतीने अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन केल्यास जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यांस व पिकांचे उत्पादन वाढण्यांस मदत होते. यासाठी सर्व शेतकरी बंधुना विनंती की, आपण आपल्या शेत जमिनीचे नियमित माती परीक्षण करुन आपल्या जमिनीची सुपिकता जाणून घ्यावी. व त्यानुसार पिकांना खताची मात्रा द्यावी. याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
                सदर कार्यक्रमास  जी.जे.ठाकुर  जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी अलिबाग,  एस.ए. कांबळे मंडळ कृषी अधिकारी पोयनाड,  आर.जे. पाटील कृषि पर्यवेक्षक, पोयनाड इ. अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक