राष्ट्रीय आरोग्य अभियान त्रैमासिक सभा :रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत द्या- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16:- शासकीय रुग्णालयातून अनेक रुग्ण उपचार घेत असतात. यातील एचआयव्ही बाधीत, क्षयरुग्ण अशा विशिष्ट रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे (दि.15 रोजी) दिले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली माळरान कृषी पर्यटन केंद्र, मु. राजमाळ, अलिबाग रेवसरोड पो. थळ ता. अलिबाग,  राश्ट्रीय आरोग्य अभियान,  जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, एचआयव्ही टीबी  समन्वय समितीची  त्रैमासिक बैठक घेण्यात आली.  या बैठकीस , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी डॉ. पांडुरंग शिंदे ,  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कोकरे, तालुका आरोग्य अधिकारी मुरुड डॉ. चंद्रकांत जगताप, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक लेख रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड इ रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम संपदा मळेकर, आधार ट्रस्ट प्रतिनिधी जागृती गुंजाळ, सीसीसी एआरटी प्रेम खंडागळे हे उपस्थित होते. 
            यावेळी एचआयव्ही एडस जनजागृतीत उद्योगांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तींना शासकीय सेवासवलती मिळाव्यात तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना रेशनकार्ड लवकरात लवकर मिळावे याकरिता विहान प्रकल्प पनवेल व लोकपरिषद एनजीओ यांच्यासहयोगाने लाभार्थ्यांची यादी तयार करुन सादर करावी. या रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी माहिती दिली की,  जानेवारी ते नोव्हेंबर १७  या कालावधीत एकूण ८६९५० रुग्णांची तपासणी केली असता त्यात  ४१७ (०. ४८ %) एचआयव्ही संसर्गित आढळले आहेत. 
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा आढावा घेतला. निवासी वैद्यकिय अधिकारी (बाह्य) डॉ. सुहास कृष्णा कोरे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमा अंतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची वर्षातून दोन वेळा व ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून एक वेळा वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या  पथकाकडून तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान नोव्हेंबर अखेर हृदय विकार असलेले ० ते ६ वर्षे वयोगटातील ३३ मुले व ६ ते १८ वर्षे वयोगटातील २७ मुले आढळली असून त्यापैकी ० ते ६ वर्षे वयोगटातील २९ व ६ ते १८ वर्षे वयोगटातील २३ मुलांची हृदय शस्त्रक्रिया फोर्टिस हॉस्पिटल वोकहार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान हॉस्पिटल मुंबई या नामांकित रुग्णालयात करण्यात आली. तसेच अन्य आजार असणारी २४३ मुले आढळली असून त्यापैकी २२१ मुलांची शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय अलिबाग व उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी करण्यात आल्या.
यावेळी  जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जेएसडब्ल्यू स्टील प्रा. ली. डोलवी, ता. पेण यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने यांनी वरील उपस्थित मान्यवरांनाचे तसेच अधिकारी वर्गाचे आभार मानले. 

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड