यशकथा :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : पुन्हा जोमाने शेतीकडे….


अलिबाग, जि. रायगड,दि.16 (जिमाका)-  न फेडलेल्या कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन शेतकरी मंगेश पाटील हे आपल्या शेतीत राबत होते. निसर्गाची अवकृपा, त्यामुळे तोंडचा घास हिरावून घेतला जात होता. शेती करण्यासाठीचे मनोबल संपले होते. परंतू शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. त्यामुळे डोक्यावरच कर्जाचं ओझं उतरलं आणि आता पुन्हा नव्या जोमाने पावले शेतीकडे वळली, हे मनोगत आहे शेतकरी कार्ले येथील शेतकरी मंगेश पाटील यांचे.
मंगेश पाटील यांनी शेतीच्या कामासाठी  जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून कर्ज घेतलं. कर्जाचे हप्ते फेडण्याचे प्रयत्न सुरु होते. पण खराब हवामान, अवकाळी पाऊस यामुळे पिकाचं नुकसान होत होतं. बँकेकडून  घेतलेलं कर्ज फेडण्याची आर्थिक समस्या निर्माण झाली. झालेल्या नुकसानीमुळे  कुटूंबावर आर्थिक संकट ओढावले, अशा वेळी शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमुळे जिल्ह्यातील 10 हजार 940 शेतकऱ्यांना 19 कोटी 61 लाख  9 हजार 846 रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यातील मंगेश पाटील हे एक. आज त्यांचे कुटूंब कर्जमाफीमुळे पुन्हा शेती करण्यास सज्ज झालं आहे.
कार्ले येथील शेतकरी मंगेश पाटील यांनी त्यांच्या 40 गुंठे शेतीत भात, कांदे, तोंडली  बियाणे पेरली होती.  शेतीच्या कामासाठी त्यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अलिबाग शाखेतून 50 हजार रुपये इतके कर्ज घेतले होते.  पण खराब हवामान, अतिवृष्टीमुळे शेतामध्ये पेरलेला भात, कांदे, तोंडली यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.  भात गळून पिक वाया गेले. कांदा कुजला.  या निसर्गाच्या कोपातही कर्जफेडीसाठी प्रयत्न होत होते.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत 1 एप्रिल, 2009 ते 30 जून, 2016 अखेर थकबाकीदार शेतकऱ्यांना 1 लाख 50 हजार रुपये पर्यंत कर्जमाफी व 1 लाख 50 हजार रुपयांवरील शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजना लागू केली. तसेच 2015-16, 2016-17 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली अशा शेतकऱ्यांना 25 टक्के किंवा 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषित केले. यामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला व तो शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात (कर्जमाफी) व बचत खात्यात (प्रोत्साहनपर) वर्ग करण्यात आला.
मंगेश पाटील यांनी यांचे थकीत 37 हजार रुपये त्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आले. शासनाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक