मानवी हक्कांबाबत जनजागृती आवश्यक -न्या.बी.सी.कांबळे

                             


                अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10 -मानवी हक्काचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.त्यामुळे मानवी हक्काची माहिती समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे.त्यासाठी मानवी हक्का बाबत जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन तदर्थ जिल्हा न्यायाधीश (1) बी.सी.कांबळे यांनी आज येथे केले.  जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

           यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती प्रेमलता जैतू,  तहसिलदार एन.बी.लोखंडे, नायब तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी, समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे, कारागृह निरीक्षक आबासाहेब पाटील तसेच शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

             आपल्या मार्गदर्शनात न्या.कांबळे म्हणाले की, जे मानवाला नैसर्गिकरित्या मिळालेले आहे ते करण्याचे स्वातंत्र्य म्हणजेच मानवी हक्क आहे. मनुष्याच्या काम करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिकचे काम देणे किंवा त्याच्या नैसर्गिक प्राप्त   झालेल्या हक्काला बाधा पोहोचविणे म्हणजेच मानवी हक्काचे उल्लंघन करणे होय.  कायद्याची अंमलबजावणी व व्यक्तीला असलेले हक्क याच्यामध्ये समन्वय राखणे महत्वाचे असल्याने  मानवी हक्काचे संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.आपल्या देशात मानवी हक्काचे संरक्षण खूप चांगल्या रितीने होते हे महत्वाचे आहे.  आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे मानवी हक्काचे संरक्षण झाले तर ते एक उत्तम फलित ठरेल. 

            संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये 10 डिसेंबर, 1948 मध्ये मानवी अधिकाराची सार्वभौम घोषणा करण्यात आली.  तेव्हापासून हा दिवस 'मानवी हक्क दिन' म्हणून जगभरात साजरा केला जातो.  मानवी हक्काबद्दल जनजागृती करणे, समाजातील सर्वांना मानवी हक्काचे ज्ञान माहिती होणे व मानवी हक्कांचे संरक्षण करुन ते वृध्दिंगत करणे,अशा प्रमुख उद्देशाने हा दिन साजरा केला जात असल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती प्रेमलता जैतू यांनी यावेळी सांगितली.    तर कार्यक्रमाचे  आभार  तहसिलदार एन.बी.लोखंडे यांनी मानले.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक