सामाजिक न्याय विभाग योजना संदेशांचे बसस्थानकांवरुन प्रसारण;आ.पंडितशेट पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- सामाजिक न्याय विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत योजनांच्या संदेशाचे प्रसारण जिल्ह्यातील बसस्थानकांवरुन करण्याच्या कामाचा शुभारंभ आज अलिबागचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
 सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना ह्या मागासवर्गीय घटकांच्या कल्याणासाठी असतात. या योजनांचा अधिकाधिक प्रसार होऊन त्या जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी बसस्थानकांवरुन ध्वनीप्रक्षेपकामार्फत या संदेशांचे प्रसारण आजपासून रायगड जिल्ह्यात सुरु करण्यात आले. अलिबागचे आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील यांच्या हस्ते या  उपक्रमाचा शुभारंभ आज अलिबाग बसस्थानकावर करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे,  अलिबाग बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक शंकर प्रकाश यादव, वृत्ती सोल्युशनचे  नरेंद्र पाटील, अमोल चौधरी, रफिक उपस्थित होते. यावेळी आ. पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर  संगणकावरील ध्वनीक्षेपण यंत्रणा व त्याचे वेळापत्रक यांची माहिती आ. पाटील यांना सांगण्यात आली. त्यानंतर संगणकावर क्लिक करुन आ. पाटील यांच्या हस्ते संदेश प्रसारणाचा शुभारंभ करण्यात आला.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल व खोपोली या चार बसस्थानकांवर ही सेवा सुरु झाली असून दिवसभरात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या संदेशाचे प्रसारण सुरु राहिल, जेणे करुन बसस्थानकावरील प्रवाशांना योजनांची थोडक्यात आवश्यक माहिती मिळेल. लवकरच ही सेवा नागोठणे व माणगाव या बसस्थानकांवरही सुरु केली जाईल. बसस्थानकावरील यासंदेश प्रसारणामुळे गरजू लोकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचण्यास मदत होईल, असे मत व्यक्त करुनआ. पाटील यांनी या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक डॉ. मिलिंद दुसाने यांनी केले तर अनिल मोरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे विठ्ठल बेंदूगडे, जयंत ठाकुर, अशोक मोरे यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक