जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शन व ग्रंथोत्सवास तळा येथे उत्साहात प्रारंभ : विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभा अविष्कारातून 90 प्रयोगांचे सादरीकरण




             अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.4- रायगड जिल्हा परिषद, शिक्षण मंडळ, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म.वेदक विद्यामंदिर व ज्यु.कॉलेज तळा, जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक मंडळ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सवाला आज तळा येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. जिल्हाभरातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेच्या अविष्काराचे दर्शन घडविणाऱ्या या प्रदर्शनात तब्बल 90 प्रयोगांचे सादरीकरण बाल वैज्ञानिकांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या हस्ते व आ. बाळाराम पाटील, आ.सुभाष पाटील यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
शनिवार दि.6 पर्यंत हे प्रदर्शन व ग्रंथोत्सव सुरु राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार सुभाष  उर्फ पंडितशेट पाटील,  नगराध्यक्ष श्रीमती रेश्मा मुंढे, जि.प. चे शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, पंचायत समितीचे सभापती रविंद्र नटे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर धामणकर, मुख्याध्यापक बी.जे.धुमाळ, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे, गट विकास अधिकारी, जि.प. सदस्य, प.स. सदस्य, नगरसेवक उपस्थित होते.
शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावे- आदितीताई तटकरे
सध्या विज्ञान युगात वावरतांना शिक्षण हा जीवनाचा मुळ पाया असल्याने तो शेवटच्या घटकांपर्यंत पोहचले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदितीताई तटकरे यांनी केले. त्या म्हणाल्या की,  शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्यासाठी सर्वांचे विचार एक झाले पाहिजेत. भावी पिढी घडली तर जिल्ह्याचे भवितव्य उत्तम राहील. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षक वर्गाने प्रयत्न करावेत. यासाठीच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाईल. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकृती अत्यंत बघण्याजोगे आहेत. म्हणून क्षमतेनुसार प्रयत्न केले तर आजचे विद्यार्थी उद्याचे भवितव्य घडविल्याशिवाय राहणार नाहीत. जि.प.च्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर असलेले ताण-तणाव दूर व्हावेत यासाठी प्रत्येक शाळांमध्ये एक आठवड्याचे विविध शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.
ग्रामिण विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन- आ. सुभाष पाटील
            आमदार सुभाष उर्फ पंडित शेट पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, भारतात अनेक वैज्ञानिक व संशोधक होऊन गेले. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम केले. त्यांचा वसा घेऊन आताचे विद्यार्थी विज्ञान युगात उत्तम काम करत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला चालना मिळण्यासाठी अशा विज्ञान प्रदर्शनांची नितांत गरज आहे.
वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथोत्सव- आ. बाळाराम पाटील
आमदार बाळाराम पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,  विज्ञान प्रदर्शनाद्वारे आधुनिक विज्ञानाची माहिती छोट्या-छोट्या गावात व तळागाळात जाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रयोग तयार करुन आत्मविश्वास निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन आहे.  ग्रंथदिंडीतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने दाखवून दिले आहे की विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण होईल. पुस्तकी ज्ञानाबरोबर खेळातही प्राविण्य विद्यार्थ्यांनी मिळवावे, असेही त्यांनी सांगितले.
            कार्यक्रमाचे प्रारंभी इशस्तवन,स्वागत गीत झाले.  मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन  मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रास्ताविक जि.प.चे शिक्षण सभापती नरेश पाटील यांनी केले. हे प्रदर्शन आयोजनामागील हेतू स्पष्ट केला.
            शेवटी संस्थेचे अध्यक्ष विद्याधर धामणकर यांनी उपस्थितींचे आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक, कलाकृती सादर केलेले विद्यार्थी ग्रामस्थ व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचे विज्ञान प्रदर्शन तीन दिवस चालणार असून यात विद्यार्थी व शिक्षक यांनी 90 हून अधिक प्रयोग सादर केले आहेत.
जिल्हास्तरीय विज्ञानप्रदर्शन व ग्रंथोत्सवामध्ये लोकराज्य स्टॉल
रायगड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथमहोत्सवामध्ये माहिती व जनंसपर्क महासंचालनालया मार्फत प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल लावण्यात आला होता. या स्टॉलला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार पंडितशेट पाटील तसेच विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थ्यांनी भेट दिली.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड