किटकनाशक विक्री नियंत्रण धोरण :नागरिकांकडून सुचना अभिप्राय मागवल्या



 अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6- कीटकनाशके फवारणीमुळे होणारी मनुष्य व प्राण्यांच्या जीवीत हानीबरोबरच, शिफारस नसलेली कीटकनाशके व त्यांचा अयोग्य प्रमाणात वापरामुळे पर्यावरणहानी,अन्न घटकांमध्ये कीटकनाशकांचे हानीकारक अंश सापडून आरोग्य समस्या देखिल निर्माण झालेल्या आहेत. यासाठी राज्य शासनामार्फत यापुढे जिल्हानिहाय / विभागनिहाय पिक पद्धतीनुसारच केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठीचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व नागरीकांकडून यावर सुचना / अभिप्राय मागविण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्फत आवाहन करण्यात आले आहे की, खरीप हंगाम 2017 मध्ये कीटकनाशकांची हाताळणी करतांना राज्यात विशेषत: यवतमाळ व राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये शेतमजूर / शेतकरी यांचे विषबाधेमुळे जीवित हानी झालेली आहे. कीटकनाशकांची काळजीपुर्वक हाताळणी करण्यासाठी कृषि विभागाने जनजागृती मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी केलेली आहे. शेतमजूर / शेतकरी यांना भविष्यात कीटकनाशकांची फवारणी करतांना जीवीतास हानी पोहोचणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे ही अत्यंत महत्वाची बाब बनली आहे. कीटकनाशक कायदा, 1968 व कीटकनाशके नियम, 1971 मधिल तरतुदीनुसार राज्यामध्ये कीटकनाशके उत्पादन, साठवणुक, विक्रीसाठी प्रदर्शन करणे व विक्री करणे यासाठी कीटकनाशकांचे परवाने दिले जातात. केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (Central Insecticides Board & Registration Committee), फरिदाबाद या देश पातळीवरील सर्वोच्च यंत्रणेद्वारे नोंदणी झालेल्याच कीटकनाशकांना परवान्याद्वारे राज्यात उत्पादन, साठवणुक, विक्रीसाठी प्रदर्शन करणे व विक्री करणे यासाठी परवानगी दिली जाते. ही सर्वोच्च यंत्रणा, प्रत्येक कीटकनाशकांच्या नेमक्या किती तीव्रतेस एखाद्या विशिष्ट पिकावरील, विशिष्ट कीड / रोगाच्या नियंत्रणास योग्य ठरेल याच्या शिफारशी देखिल निश्चित करते. 
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यु पावलेल्या शेतमजूर / शेतकरी प्रकरणांचा राज्य शासन व कृषि क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत झालेल्या अभ्यासातून खालील बाबी ठळकपणे निदर्शनास आलेल्या आहेत.
     अ) ज्या पिकासाठी / कीडीसाठी शिफारस केलेली आहे त्यासाठी निश्चित केलेल्या कीटकनाशकां
 व्यतिरिक्त इतर शिफारस नसलेली कीटकनाशके विक्री व वापर.
     ब)  निश्चित / शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त तिव्रतेच्या कीटकनाशकांची विक्री व वापर.
     क)  पिक संरक्षणा करीता शिफारस नसलेली कीटकनाशके विक्री व वापर.
     ड)  शिफारस नसलेल्या वेगवेगळ्या कीटकनाशकांची मिश्रणे विक्री व वापर.
या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, सोबतच्या यादीतील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC), फरिदाबाद यांनी शिफारस केलेल्या प्रमाणेच कीटकनाशकांचा वापर करावा. तसेच सर्व कीटकनाशके उत्पादक, वितरक व विक्रेत्यांना याद्वारे स्पष्ट निर्देश देण्यात येत आहेत की, शिफारशी नसलेल्या कीटकनाशकांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. विक्रेत्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पिक पद्धतीनुसार आवश्यक त्या पिकांची / कीड रोग नियंत्रणांचीच कीटकनाशके विक्री करावीत.
केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांनी पिकनिहाय शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा तपशिल कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईटमधिल निविष्ठा मेनुतील कीटकनाशक या पर्याया अंतर्गत दिलेल्या ‘सर्वसाधारण माहिती’ मध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे.
कीटकनाशके फवारणीमुळे होणारी मनुष्य व प्राण्यांच्या जीवीत हानीबरोबरच, शिफारस नसलेली कीटकनाशके व त्यांचा अयोग्य प्रमाणात वापर याचा पर्यावरणहानी बरोबरच मनुष्य व प्राण्यांच्या अन्न घटकांमध्ये कीटकनाशकांचे हानीकारक अंश सापडून आरोग्य समस्या देखिल निर्माण झालेल्या आहेत. यासाठी राज्य शासनामार्फत यापुढे जिल्हानिहाय / विभागनिहाय पिक पद्धतीनुसारच केवळ नोंदणीकृत व शिफारस केलेल्याच कीटकनाशकांच्या विक्रीवर नियंत्रण आणन्यासाठीचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व नागरीकांकडून यावर सुचना / अभिप्राय मागविण्यात येत आहेत.
यासाठी आपल्या सुचना / अभिप्राय लिखित स्वरूपात मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, सेंट्रल बिल्डिंग, पुणे – 411001 या पत्त्यावर किंवा cqcopest@gmail.com या e-mail ID वर पाठवावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक