बोगस डॉक्टर्सचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी


         


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21-जिल्ह्यातील बोगस पदव्यांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर्सना शोधून त्यांच्यावर कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी येथे शनिवारी (दि.२०) दिले. जिल्ह्यातील आय.एम.ए., आर.एम.ए., आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना, होमिओपथीक वैद्यकीय संघटनाकडून बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.
               यासंदर्भात
  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.सचिन देसाई,अति.शल्यचिकीत्सकडॉ.फुटाणे उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी म्हणाले की, तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, नगरपालिकास्तरावर मुख्याधिकारी व पनवेल महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती मागविण्यात यावी.  तसेच आय.एम.ए., आर.एम.ए., आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना, होमिओपथीक वैद्यकीय संघटना व समित्यांकडून माहिती प्राप्त करुन त्या त्या तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये कागदपत्रे जमा करण्यात यावी.  जिल्ह्यात काही लोक बोगस डिग्री लावून वैद्यकीय व्यवसाय करतात त्यांची तपासणी करुन कारवाई करावी. नागरीकांनीही आपल्या जवळपासच्या परिसरात असे बोगस डॉक्टर्स असल्यास त्याची माहिती पोलीस मुख्यालयातील व्हॉट्सअप मेसेज किंवा एसएमएस द्वारे द्यावी. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक 7057672227 तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक 02141-222322 वर संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी यावेळी  केले.  

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक