प्रजासत्ताक दिन सोहळा मतदानाचा अधिकार वापरून लोकशाही बळकट करु या-ना. प्रकाश महेता


       



  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.26- जगातील सर्वात मोठा लोकशाही देश ही आपली ओळख आहे. ही ओळख राज्यघटनेने आपल्याला दिलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे आहे. आपली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी निवडणूक कोणतीही असो; आपला मतदानाचा अधिकार अवश्य वापरु या, असे आवाहन राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश महेता यांनी आज येथे केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापनदिन सोहळ्याचा रायगड जिल्ह्याचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित नागरिकांना ना. महेता यांनी संबोधित केले.
या सोहळ्याला माजी नौदल प्रमुख ॲडमिरल एल.रामदास यांची सपत्निक उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक  अनिल पारसकर, जिल्हा न्यायाधीश सेवलीकर, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर, अपर पोलीस अधिक्षक संजय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी दुफारे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन डॉ. श्रीधर बोधे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई आदी, मान्यवर स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी ना. महेता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. लगेचच राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री ना. महेता यांनी उघड्या वाहनातून परेडचे निरीक्षण केले. ना. महेता यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्यांना सन्मानित करण्यात आले. पालकमंत्र्यांना पोलीस दल व अन्य दलांनी मानवंदना दिली. यावेळी झालेल्या शानदार संचलनात 18 पथकांनी सहभाग दिला. पोलीस बॅन्डच्या सुरावटींवर  तालबद्ध संचलनाने उपस्थितांची मने जिंकली.
आपल्या भाषणात ना. महेता यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, शासनाने विविध लोकाभिमुख योजना राबवून महाराष्ट्रातील सामान्य शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण जनता, महिला या सर्व घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न चालवला आहे. यावर्षी रीप आणि रब्बी हंगामात  157 कोटी 36 लाख रुपये इतके अर्थसहाय्य करुन  शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यात रायगड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरला  आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 675 जणांना त्यांच्या उद्योग, व्यवसायासाठी  244 कोटी 64 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. यामुळे जिल्ह्यात स्वयंरोजगाराला चांगली चालना मिळाली आहे, असे सांगून ना. महेता यांनी समाधान व्यक्त केले.
 जिल्ह्यातील आरोग्यसेवेत सुधारणेसाठी होत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त करुन ना. महेता यांनी, अत्यवस्थ रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी कमीत कमी वेळेत पोहोचविता यावे यासाठी लवकरच अलिबाग ते मुंबई ही बोट ॲम्ब्युलन्स सेवा सुरु होईल,असे जाहीर केले.
जिल्ह्यात ग्राम सामाजिक परिवर्तन कार्यक्रम अंतर्गत 22 गावांमध्ये ग्रामसामाजिक प्रवर्तकांच्या माध्यमातून विविध शासकीय यंत्रणांद्वारे ग्राम विकासाचे मॉडेल ठरावे असे काम होत आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले. दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर कमी करुन प्लास्टीक प्रदुषणाला आळा घालण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही ना. महेता यांनी केले.
 यावेळी खालील मान्यवरांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष सेवा पदक- प्रकाश मारुती सपकाळ, रेवदंडा पोलीस ठाणे व धनंजय धुळा दडस, खालापुर पोलीस ठाणे.
जिल्हा उद्योग पुरस्कार- प्रथम- कपूर ग्लॉस (इंडिया) प्रा. लि. संचालक संजीव धर्मेंद्र  कपूर, कामोठे, पनवेल., द्वितीय- मे. आहील प्रॉडक्ट्स कंपनी प्रा. लि.  संचालक अश्फाक सय्यद लोगडे, साजगाव ढेकू ता. खालापूर
जिल्हा उत्कृष्ठ युवा मंडळ पुरस्कार- महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान, युवा मंडळ, मु. पाणदिवे ता. उरण.
या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्रीमती किरण करंदीकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या  वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. या समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी दुफारे, उपजिल्हाधिकारी सामान्य शाखा डॉ. श्रीधर बोधे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विश्वनाथ वेटकोळी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी   पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले.  यावेळी सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच  नागरिक उपस्थित होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी  उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक