विविध कार्यकारी संस्था बळकटीकरणासाठी 'राजिम बॅंकेने' योगदान द्यावे-सहकारमंत्री ना. सुभाष देशमुख


अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.23:-  ग्रामिण अर्थव्यवस्थेत  विविध कार्यकारी संस्था ह्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यादृष्टिने विविध कार्यकारी संस्था बळकटीकरणासाठी अटल महापणन अभियान सुरु करण्यात आले असून त्याअंतर्गत  रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक विविध कार्यकारी सोसायट्यांचे बळकटीकरण करण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने योगदान द्यावे, असे निर्देश राज्याचे  सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री ना. सुभाष देशमुख यांनी आज येथे दिले.
 येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा आढावा ना. देशमुख यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष उर्फ पंडितशेट पाटील, संचालक सुरेश खैरे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, ॲड. परेश देशमुख, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पी.एम .खोडका, जिल्हा विशेष लेखापरिक्षक  तुपे, बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप नाईक  तसेच सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते.
यावेळी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप नाईक यांनी सादरीकरणातून बॅंकेच्या विविध कामगिरीबद्दल व अभिनव उपक्रमांना चालना देणारी देशातील अग्रेसर सहकारी बॅंक असल्याबाबत  माहिती दिली. तसेच बॅंकेच्या मोबाईल ॲपचा शुभारंभही यावेळी ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.  अध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीही बॅंकेच्या ध्येय्य धोरणांबाबत माहिती दिली व सहकारी संस्थांना व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन देऊन  विविध कार्यकारी संस्थांना स्वावलंबी करण्यासाठी बॅंक काम करीत आहे, असे सांगितले.
ना. देशमुख म्हणाले की,सहकार हा सेवाभावाने केला पाहिजे. त्यासाठी व्यापक हित महत्त्वाचे आहे. आपसातले हेवेदावे बाजूला ठेवले तरच सहकारातून समृद्धी होऊ शकते. जिल्ह्यातील 804 महसूली गावांचा विचार करता विविध कार्यकारी संस्थांची संख्या खूप कमी आहे. प्रत्येक गावात विविध कार्यकारी संस्था सुरु झाल्या पाहिजेत. त्यांना व्यवसाय दिले पाहिजेत यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने योगदान द्यावे. त्यासाठी बॅंकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला एक गाव दत्तक देऊन संस्था उभारणीस चालना द्यावी, असे निर्देश ना. देशमुख यांनी दिले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कामगिरीचे कौतूक करुन त्यांनी सांगितले की, राज्याला आदर्श घालून देणारे काम रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेनी  करावे आणि जिल्ह्यातील सहकारात समृद्धी आणावी.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक