तटरक्षक दलातर्फे मच्छिमार बांधवांना सुरक्षेचे धडे


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:-  भारतीय तटरक्षक दलाच्या स्थापनादिनानिमित्त रायगड व ठाणे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना एका मेळाव्याचे आयोजन करुन सुरक्षविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
भारतीय तटरक्षक दलाच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त नवी मुंबई येथील  सरोवर विहार, सीबीडी बेलापूर येथे  मच्छिमारांचा मेळावा आयोजित  करण्यात आला. या मेळाव्यास  तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक विवेक वाजपेयी यांची उपस्थिती होती. यावेळी  तटरक्षक दल महाराष्ट्राचे  समादेशक मुकूल गर्ग,  कमांडंट आर. के. श्रीवास्तव, मच्छिमार संघटानांचे प्रतिनिधी  शिवदास नाखवा, हरिश्चंद्र  सुतार  आदी मान्यवर उपस्थित होते.
तटरक्षक दलाच्या सामाजिक सहभागिता उपक्रमांचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी  करंजा, उरण, मोरा, सानपाडा, वाशी, घनसोली, कोपरखैरणे, ऐरोली,  बेलापूर, दिवाळे या गावातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तटरक्षक दलाच्या वतीने मच्छिमारांना समुद्रात मोहिमेवर असतांना पाळावयाच्या सुरक्षानियम व उपाययोजनांची माहिती देण्यात आली. त्यात जहाजावर लाईफ जॅकेटचा वापर करणे. अग्निप्रतिबंधक उपकरणे व उपाययोजना याविषयी माहिती देण्यात आली. 
मच्छिमारांना समुद्रात असतांना तटरक्षक दलाने दिलेले  बायोमेट्रिक ओळखपत्रे, आधार ओळखपत्रे  सतत सोबत बाळगावे. तसेच समुद्रात वा किनाऱ्यावर नजरेस आलेल्या संशयास्पद हालचालींची माहिती त्वरीत द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमानंतर तटरक्षक दलाच्या संघा सोबत मच्छिमार बांधवांच्या संघाचा मैत्रीपूर्ण व्हॉलीबॉल सामनाही झाला. या कार्यक्रमास मच्छिमार बांधव तसेच तटरक्षक दलाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक