राष्ट्रीय मतदार दिवस : प्रत्येक मतदाराचा मतदानात सहभाग आवश्यक-जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी


         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25- मतदान करणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे.  मतदान करतांना आपली सद्सदविवेकबुध्दी जागृत ठेवून मतदान अवश्य करावे. लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानात सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
            राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने जनरल अरुणकुमार वैद्य हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार  प्रकाश सकपाळ, प्राचार्या श्रीमती सरला केणी, श्रीमती अनिता पाटील,  प्रिझम संस्थेच्या श्रीमती तपस्वी गोंधळी आदी मान्यवर उपस्थित होते.
           यावेळी नवमतदारांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, ज्यांचे वय 1 जानेवारी 2018 रोजी  18 वर्षे पूर्ण झाले आणि ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविले आहे, असे नवीन मतदार येणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहेत.  आपल्याला मतदानाचा हक्क मिळाला आहे.  मतदान करणे हे आपले कर्तव्यसुध्दा आहे.  म्हणूनच मतदान जागरुकपणे करावे. नवमतदारांनी आपल्या घरातील मतदारांची नावे मतदार यादीत आहेत किंवा नाहीत हे पहावे. तसेच मतदानाच्या वेळी मतदान करण्यासाठी त्यांना आग्रह करावा. ज्यांचे मतदार यादीत नाव नसेल अशांनी उपजिल्हानिवडणूक अधिकारी तसेच तालुक्यातील संबंधित निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मतदार यादीत आपले नाव नोंदवावे असे, आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी केले.
            उपविभागीय अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, 25जानेवारी 2011 पासून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो.  या दिवसाचे औचित्य साधून मतदार यादीत नावनोंदणी करण्याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येते.  लोकशाही व्यवस्थेत मतदान करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्य व हक्क आहे.  आपल्या हक्काबरोबर मतदानाचे कर्तव्य देखील नागरिकांनी पार पाडावे जेणेकरुन लोकशाही बळकट होईल.
            यावेळी नवीन मतदार यादीत नोंदणी झालेल्या भक्ती गणेश राऊत, धनश्री हरिश्चंद्र मेस्त्री, सौरभ श्रीकांत माळवी, मोहिनी चंद्रकांत पाटील, रमिता अशोक नवगावकर, शुभांगी अशोक लगड, श्रध्दा नंदकुमार बाबरंकर, पुजा जितेंद्र भोसले  या मतदारांना मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
            तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी  मानसी महेश म्हात्रे नारंगी, धनंजय प्रभू फड आवास, संतोष नारायण ठाकूण मांडवखार-1, सारीका धनुर्धर पाटील वाघ्रण, हर्षद सुरेश राऊत मापगाव, रुपेश सदानंद म्हात्रे सागरगड,  श्रीकांत इचके तहसिल कार्यालय पनवेल, भरत जाधव तहसिल कार्यालय महाड यांना  प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.   तसेच प्रझिम सामाजिक संस्थेंच्या प्रमुख श्रीमती तपस्वी गोंधळी यांची जिल्हा आयकॉन म्हणून निवड झाल्याने त्यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.  त्याचबरोबर अपंग मतदार प्रभाकर तळप किहिम, अनिल बोराडे पेण यांचाही सत्कार करण्यात आला.
            राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.   या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या विविध शाळेतील पहिल्या तीन क्रमांकांना गौरविण्यात  आले.
            राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून मतदार जनजागृतीसाठी अलिबाग शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली.  तसेच प्रिझम  सामाजिक संस्था अलिबाग यांनी जनजागृतीसाठी पथनाटय सादर केले.
            आभार प्रदर्शन तहसिलदार प्रकाश सकपाळ यांनी केले.  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व इशस्तवनाने करण्यात आली.  यावेळी उपस्थित मतदारांना प्रतिज्ञा देण्यात आली.  कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक