जतन, संवर्धनाची कामे करतांना खबरदारी बाळगावी-खा. संभाजी राजे


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.28-  रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगड विकासाच्या कामांना गती द्यावी. किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे  जतन, संवर्धनाची कामे करताना ती भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीत व खबरदारी बाळगून करावीत, असे निर्देश रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी मंगळवारी (दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत दिले.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, निमंत्रित सदस्य रघुजीराजे आंग्रे, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच प्राधिकरण समितीचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार संभाजी राजे यांनी रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखड्याचा आढावा घेतला. तसेच प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांना किल्ले रायगड आणि परिसर विकासाची कामे करताना कोणात्या तांत्रिक अडचणी येतात याची माहिती करुन घेतली. अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता, ई-निविदा या बाबत काही अडचणी असल्यास  त्याचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. भारतीय पुरातत्व विभागाकडे कोणते प्रस्ताव प्रलंबित असतील तर त्याचा पाठपुरावा करुन मान्यता घेण्यात यावी. आराखड्यातील प्रस्तावित केलेल्या कामांचे वर्गीकरण करुन भारतीय पुरातत्व विभाग व विशेष स्थापत्य पथक रायगड किल्ला यांनी त्यांना सोपविलेली कामे करावीत. रायगड किल्ल्याबाबत महत्वाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचे जतन करुन त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करावी. उत्खनन करताना ज्या इतिहासकालीन बाबी सापडतील त्याची योग्य ती निगा राखावी. पूर्ण कामांची व्हिडीओ शुटिंग करावी. सर्वांनी एकत्र येऊन  किल्ले रायगड व पसिराच्या विकासाची कामे तात्काळ सुरु  करावयाची आहेत. यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल तसेच  असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या. बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक