सूक्ष्म कौशल्ये व तणाव मुक्ती विषयांचा प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी


        अलिबाग,जि. रायगड दि.5- शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देतांना त्यात शासकीय कामकाजाचा आवश्यक भाग तर असावाच मात्र त्यासोबतच कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाजात उपयोगी पडणारी संवाद कौशल्ये, सूक्ष्म कौशल्ये तसेच कामामुळे निर्माण होणाऱ्या तणावमुक्ती या विषयांचाही समावेश करा, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर सकारात्मक परिणाम दिसून येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे केले.
            जिल्ह्यातील खोपोली ता. खालापूर येथिल  प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते.                        या बैठकीस  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके, रामेती प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी.डी. शिगेदार , जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख अनिल लोखंडे, कामगार उपायुक्त अ.र. काकतकर, कामगार अधिकारी नि. का.देठे, कार्यकारी अभियंता साबांवि पनवेल आर.एस, मोरे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी प्राचार्य पी.डी. शिगेदार यांनी संस्थेची व संस्थेतील उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे सांगितली. जिल्ह्यातील  तसेच विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी सदर संस्था अधिकृत असून राज्य प्रशिक्षण धोरणानुसार या संस्थेत शासनाच्या वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम  आयोजित केले जातात. या शिवाय आवश्यकतेनुसार तांत्रिक प्रशिक्षण ही आयोजित केले जातात. गेल्या वर्षभरात संस्थेतून १७७३ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक