पालकमंत्र्यांची आढावा बैठक: 'मिशन-मोड' मध्ये काम करा- ना.रविंद्र चव्हाण


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून अनेक विकासाच्या योजना आणि प्रकल्प शासनाने कार्यान्वित केले आहेत. हे प्रकल्प पूर्णत्वाला आणण्यासाठी शासकीय यंत्रणेने 'मिशन-मोड' मध्ये काम करावे आणि कामांचे चांगले परिणाम दाखवावे, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
 रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ना. चव्हाण यांचा आजचा पहिला दौर. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आणि विकासकामांचा आढावा ना. चव्हाण यांनी घेतला. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी,  आ. प्रशांत ठाकूर, महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर,  उपवनसंरक्षक मनिषकुमार, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा परिषदेचे अति. मुख्यकार्यकारी अधिकारी भोर,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,  जिल्हा उपनिबंधक खोडका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  राष्ट्रीय महामार्गचे प्रशांत फेगडे, माजी आमदार देवेंद्र साटम तसेच शासनाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
 बैठकीच्या प्रारंभी जिल्हा प्रशासनाच्या वतीन नूतन पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी पुस्तक भेट देऊन स्वागत केले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला. त्यानंतर विविध विभागांनी त्यांच्या मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या सद्यस्थितीचा आढावा सादर केला.
यावेळी उपस्थितांना  मार्गदर्शन करतांना ना. चव्हाण म्हणाले की,रायगड जिल्हा हा भाताचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा असुन येथे जास्तीत जास्त भात खरेदी शासनाच्या भात खरेदी केंद्रावर व्हावी यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत अधिक सखोल लक्ष देऊन काम करावे. जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्राम सामाजिक प्रवर्तकांमार्फत विविध गावांचा विकास होत आहे, या कामांकडे संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे.  विविध कर्ज योजनांमध्ये नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी बॅंक अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक लावावी. त्यात त्याचा आढावा घेण्यात येईल. जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी यंत्रणेने मिशन मोड मध्ये काम करावे आणि योजनांचे चांगले परिणाम दाखवावे, असे निर्देशही यावेळी ना. चव्हाण यांनी दिले.
बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करुन जिल्ह्याच्या विकासासंदर्भात पत्रकारांकडून माहिती जाणून घेतली.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक