श्री.सिद्धीविनायक मंदिर न्यासातर्फे जिल्हा प्रशासनाला 1 कोटी रुपये: लोकसेवेतच ईश्वर सेवा- आदेश बांदेकर




        अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका)- श्री. सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडे समाजातील दानशूर लोकांकडून आलेल्या दानाचा सत्पात्रि विनियोग व्हावा; यासाठी समाजातील गरजू लोकांना आरोग्य, शिक्षण सुविधांसाठी मंदिर न्यास मदत देत असते. हा पैसा लोकांच्या उपयोगी यावा लोकसेवेतच ईश्वर सेवा आहे, या ध्येय्याने मंदिर न्यास कार्य करीत असते, असे प्रतिपादन श्री. सिद्धी विनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी आज येथे केले.
 राज्यशासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत  होणाऱ्या जलसंधारण कामांसाठी श्री सिद्धी विनायक मंदिर न्यासातर्फे  आर्थिक मदत दिली जाते. त्याअंतर्गत आज रायगड जिल्ह्याला एक कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश  जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यासाठी मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर हे अलिबाग येथे आले होते. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे त्यांनी एक कोटी रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.  त्यांचे समवेत मंदिर न्यासाचे विश्वस्त तसेच जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी श्रीधर बोधे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव,, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, प्रकल्प संचालक (आत्मा) एम.एस.डावरेआदी उपस्थित होते.
            यावेळी बांदेकर यांनी उपस्थितांना माहिती दिली की,  गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासाठी  1 कोटी 19 लाख तर यावर्षी 1 कोटी रुपये याप्रमाणे निधी दिला आहे. याशिवाय राज्यात सुरु असलेल्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानासाठीही मंदिर न्यासाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 10 कोटी रुपयांचा निधी सुपूर्द केला. या अभियानात रायगड जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतीतील 56 गावांचा समावेश आहे. त्यामुळे या निधीतूनही रायगड जिल्ह्याला निधी मिळणार आहे.  मंदिर न्यासातर्फे राज्यात 102 डायलिसीस युनिटस दिली जाणार आहेत . यातील रायगड जिल्ह्यासाठी 12 युनिट्स  दिली जातील. जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे 4, महाड उप जिल्हा रुग्णालयाला 4 आणि माणगाव येथील  उप जिल्हा रुग्णालयाला 4 असे तीन ठिकाणी बसविण्यात येतील. या प्रत्येक ठिकाणी म्हणजे तीनही ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रही बसविण्यात येतील. यावेळी बांदेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की, सिद्धी विनायक मंदिर न्यास हे रायगड जिल्ह्यात महामार्गालगत रुग्णालय उभारू इच्छिते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी. तसेच रायगड जिल्ह्यात सर्पदंश उपचार केंद्र सुरु करण्यासाठीही मंदिर न्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून कोणाही गरजू व्यक्तिला वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास  श्री. सिद्धी विनायक न्यासाच्या पोर्टलच्या लिंकवरुन अर्ज करावा.
 जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी श्री. सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर व उपस्थित विश्वस्तांचे आभार मानले. ते यावेळी म्हणाले की, जिल्ह्यात आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी  कायापालट अभियान राबविले जात आहे. त्यासाठी सरकारी दवाखाने व रुग्णालयांमध्ये  विविध सुविधांच्या पुर्ततेसाठीही मंदिर न्यासाने मदत करावी. जिल्ह्यात प्रत्येक गावात अभ्यासिका सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुस्तकांसाठी मंदिर न्यासाने मदत करावी, असे आवाहन केले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक