जलजागृती सप्ताह प्रत्येक गावात जलदूत तयार करणे आवश्यक ---जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी




अलिबाग,जि. रायगड, (जिमाका)दि.16-   महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात 16 ते 22 मार्च 2018 या कालावधीत  जलजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.  या सप्ताहात पाण्याचे महत्व जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक गावात जलदूत तयार करुन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन  जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आज येथे केले.   जलसंपदा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात जलजागृती सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर कोकण पाटबंधारे  प्रकल्प मंडळ ठाणे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ होते.  तर कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एन.साळुखे,  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, रायगड पाटबंधारे विभाग कोलाडचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अधियंता एस.डी.गाढे, पर्यावरण समितीच्या सचिव श्रीमती संगिता जोशी, प्राध्यापक हेमंत सामंत तसेच जलसंपदा विभागातील अधिकारी,कर्मचारी  उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन जिल्हाधिकारी श्री.सुर्यवंशी म्हणाले की, सर्व सजीव सृष्टीला पाण्याची आवश्यकता आहे. पाणी हे जीवन आहे तसेच ते अमुल्य आहे. म्हणून पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पोहचावा यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत. तसेच पाण्याचे यथायोग्य नियोजन करणे काळाची गरज आहे. प्रत्येकाने पाणी बचतीचा अवलंब करावा. पाणी वाचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घेतला पाहिजे.   तसेच शाळेत, महाविद्यालयात पथनाट्याद्वारेही जनजागृती करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.    जगण्यासाठी जसा श्वास महत्वाचा तितकेच पाणी महत्वाचे आहे.    जिल्ह्यात पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून जलयुक्त शिवार योजनाही फलदायी ठरली आहे.  पाण्याचा अपव्यय होता कामा नये असेही ते म्हणाले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना श्री.मिसाळ म्हणाले की, पाणी हा विषय आपल्या जीवनाशी निगडीत  घटक  असून त्याचा वापर करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.    जिल्ह्यात असलेल्या नद्या, तलाव, पाझर झरे याचे जलव्यवस्थापन शाश्वत पध्दतीने केल्यास पाण्याची बचत होऊन आपले जीवनमान उंचविण्यासाठी  त्याची मदत होते.    लोकसहभागाच्या माध्यमातून आपल्या काही  उणिवा असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.   कोकणामध्ये पाऊस चांगल्याप्रकारे होत असल्यामुळे त्याचे जलव्यवस्थापन होणेही गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये भाजीपाल्याची लागवड करुन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.   
तसेच पर्यावरण समितीच्या सचिव श्रीमती संगिता जोशी, प्राध्यापक हेमंत सामंत यांनीही आपल्या मनोगतात पाणी बचत व जलजागृती सप्ताहाचे महत्व विशद करुन उपस्थितांना सांगितले.    जिल्ह्यातील आंबा, कुंडलीका, सावित्री, पाताळगंगा, उल्हास या नद्यांतील पवित्र जल एकत्र करुन जलकलशाचे पुजनही जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  
प्रांरभी जलसाक्षरता अभियानाबाबत स्वामी कला मंच मुंबई यांनी मुखनाट्य सादर केले. तर उत्तर कोकण पाटबंधारे  प्रकल्प मंडळ ठाणे व पाटबंधारे मंडळ रायगड आणि सरिता कला मंच अमदनगर यांनी जलजागृतीपर गीत सादर केले.  तसेच जलप्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले. रायगड जिल्हयातील विविध पाटबंधारे प्रकल्पांची माहिती सादरीकरणाव्दारे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व या सप्ताहानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती रायगड पाटबंधारे विभाग कोलाडचे कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी दिली.  तर आभार हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अधियंता एस.डी.गाढे, यांनी मानले. 
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक