जिल्हा अरिष्ट समुह गट बैठक क्षेत्रांनुसार उद्योगांसाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन नियोजन करा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश



अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.17-जिल्ह्यात सहा विविध क्षेत्रांमध्ये औद्योगिक वसाहतींचे एकत्रिकरण झालेले आहे. या सहाही विभागात कुठलीही आपत्तीची घटना घडल्यास त्या त्या ठिकाणी वेळीच मदत व बचाव कार्य सुरु करता यावे या दृष्टीने  सहा क्षेत्रांसाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करुन सज्जता ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
जिल्हा आरिष्ट समुह गटाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या सह जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  उद्योग उपसंचालाक दिलीप सोनवणे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सुनिल चव्हाण तसेच सर्व उद्योग घटक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 यावेळी माहिती सादर करण्यात आली की,  जिल्ह्यातील रासायनिक उद्योगांची संख्या अधिक आहे.  फॅक्टरी ॲक्ट अनुसार स्थापित असलेल्या उद्योगांची ही संख्या 1355 असून  त्यात 422 रासायनिक उद्योग आहेत. तर त्यापैकी 58 उद्योग हे अतिसंवेदनशील म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहेत.  या उद्योगांत रसायनांची साठवण, प्रक्रिया, वाहतूक या दरम्यान विविध अपघात होत असतात. ते न होण्यासाठी विविध प्रकारची खबरदारी व प्रतिबंधात्मक यंत्रणा सुसज्ज असणे आवश्यक आहे. हे उद्योग प्रामुख्याने  तळोजा-पनवेल -उरण,  पाताळगंगा- रसायनी, खालापूर- खोपोली, रोहा- नागोठणे-पाली, अलिबाग- पेण- मुरुड आणि महाड अशा सहा विभागांमध्ये एकवटलेले आहेत. त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी आपत्तीच्या प्रसंगी त्वरीत प्रतिसाद देता यावा यासाठी स्वतंत्र प्रतिसाद दले तयार करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक