शिक्षण, आरोग्य, पाणी सुविधांनिर्मितीसाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीचे योगदान द्या-जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन




अलिबाग,जि. रायगड,(जिमाका)दि.17-जिल्ह्यातील उद्योगांनी आपला सामाजिक उत्तरदायित्व निधी खर्च करतांना तो जिल्ह्यातील  आरोग्य, शिक्षण, पाणी या सारख्या जीवनावश्यक सेवासुविधांसाठी उपलब्ध करुन द्यावा आणि सामान्य, गोरगरिबांचे जीवन अधिक सुखकर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी आज येथे केले.
 जिल्ह्यातील उद्योग घटकांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. याबैठकीस जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या सह जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारस्कर,  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  उद्योग उपसंचालाक दिलीप सोनवणे, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सुनिल चव्हाण तसेच सर्व उद्योग घटक, उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 यावेळी आरोग्य सेवांच्या बळकटी करणासाठी ग्रामिण भागातील  सेवासुविधांसाठी 19 कोटी 13 लाख रुपये खर्च अपेक्षित असून इतक्या निधीत ग्रामिण आरोग्य यंत्रणा बळकट होऊन उत्तम सुविधा लोकांना उपलब्ध होतील. तर जिल्हा रुग्णालयात  साधने व सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी 4 कोटी 28 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याची माहिती यावेळी  अनुक्रमे जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले की, उद्योगांनी त्यांचा सामाजिक उत्तर दायित्व निधी हा कायापालट अभियानांतर्गत आरोग्य यंत्रणांच्या विकासासाठी द्यावा.  तसेच आदिवासी क्षेत्रात  सौर पथदिवे, सौर पंप, लहान लहान पाणी योजना, पाणी शुद्धिकरण यंत्रे आदी सुविधांसाठी द्यावा. तसेच जिल्ह्यातील गड किल्ले दत्तक घेऊन तेथे किमान सुविधांची उपलब्धता करुन द्यावी. वाचनालयांसाठी पुस्तके खरेदी करावी, शिक्षणासाठी शाळांना संगणक, ई- लर्निंग सुविधा, उपलब्ध करुन द्यावी. शिवाय बीचेस दत्तक घेऊन तेथे स्वच्छता व देखभालीचे उपक्रम राबवावे, जेणे करुन जिल्ह्यातील पर्यटनाला चांगली चालना मिळेल, असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.  यावेळी जिल्ह्यातील विविध उद्योग व उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक