कृषि विभागाचा उपक्रम तालुकास्तरावर 2 मे रोजी किसान कल्याण कार्यशाळा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.25-  प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार देशभरात दि.14 एप्रिल ते दि.5 मे या कालावधीत ग्राम स्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान कालावधीत  बुधवार दि.2 मे रोजी राज्यात सर्व तालुकास्तरावर किसान कल्याण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी कृषि व कृषि सलग्न विभागाशी संबंधित विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्यासाठीचे धोरण, कृषि विभागाच्या विविध योजना या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याच दिवशी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत खरीप नियोजन बैठक आयोजित केली आहे.
 तालुकास्तरावर आयोजित कार्यशाळेत मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण यामध्ये देण्यात आलेल्या खत व्यवस्थापन करणेसाठी आवश्यक प्रशिक्षण, कीटक नाशके फवारताना घ्यावयाची काळजी, शेतमाल काढणी पश्चात घ्यावयाची काळजी, शेतमाल स्वच्छता प्रतवारीसाठी आवश्यक प्रशिक्षण, पशुचिकित्सा शिबीर, कापसावरील बोंड अळीचे नियंत्रण, प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड लिंकिंगसाठी जनजागृती मोहीम, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणेसाठी मार्गदर्शक घडीपत्रिकेचे वितरण, केंद्र राज्य शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रगतीशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा,कृषि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी केलेले चांगले काम इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यात येईल. कृषि संलग्न विषयावरील चित्रफित दाखविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न सन २०२२ पर्यंत दुप्पट करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून मार्गदर्शन करणे हा आहे. या कार्यशाळेमध्ये जिल्हास्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, दुग्ध विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय, जिल्हा पणन अधिकारी, रेशीम उद्योगाचे अधिकारी, जिल्हा परिषद कृषि विभाग इतर संलग्न विभाग यांचा सहभाग राहणार आहे. तसेच प्रगतीशील शेतकरी, पुरस्कार प्राप्त शेतकरी सहभागी होतील. या कार्यशाळेत शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त (कृषि) यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक