काकळ गावात घडतेय सामाजिक परिवर्तन कुक्कुट पालनातून 38 कुटूंबांना लाभला शाश्वत रोजगार


            अलिबाग,जि. रायगड, दि.5(डॉ.मिलिंद दुसाने)- दुर्गम भागात असणाऱ्या काकळ ता. माणगाव या गावात रोजगारासाठी स्थलांतराची समस्या. येथील गावकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी  पशुसंवर्धन विभागाच्या वतीने परसातील कुक्कुट पालन आणि त्याला शेळीपालन व पशुपालनाची जोड दिल्याने गावकऱ्यांना घरच्या घरी रोजगार उपलब्ध झाला आहे. तब्बल 38 लाभार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला असून शेतीपूरक शाश्वत रोजगार उपलब्ध झाला आहे. गावात राबविण्यात येत असलेल्या ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानातून ही किमया घडली आहे.
या गावात  रोजगारासाठी स्थलांतर हा एक सामाजिक प्रश्न होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानात या गावाची निवड झाली. रायगड जिल्ह्यात 22 ग्रामपंचायतींमधील 56 गावांमध्ये हे अभियान राबविले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रत्येक गावात स्थानिक प्रशासनातले अधिकारी हे संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायत काकळ, ता.माणगाव, या गावाकरीता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ.सुभाष म्हस्के हे  संपर्क अधिकारी आहेत. त्यांनी या गावाशी सतत संपर्क ठेवून पशुपालन हा उत्तम शेतीपूरक व्यवसाय असल्याचे गावकऱ्यांना पटवून दिले. शेतकऱ्यांचा पशुपालनाप्रति आत्मविश्वास वाढावा यासाठी त्यांना  ते  कर्जत येथे घेऊन गेले. तेथे एकात्मिक पशुसंवर्धन पध्दतीद्वारे होत असलेले गीर गायीचे संगोपन, संकरीत/देशी शेळी पालन, ससे पालन, बदक पालन, संकरीत गाई व म्हशी यांचे पालन, दुध विक्री व्यवस्था, कडकनाथ, गिरीराज, वनराज या कोंबड्यांच्या संगोपनाचे प्रात्यक्षिक, चारा वैरण व्यवस्थापन, अझोला  आणि हायड्रोफोनिक्स या सर्व पशुसंवर्धन आणि संगोपनाच्या अनुषंगाने आवश्यक बाबींची प्रत्यक्ष माहिती दिली. या क्षेत्र भेटीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला.
गावातील शेतकऱ्यांचे तात्काळ शाश्वत उत्पन्न वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी कमी खर्चात, कमी जागेत आणि घरच्या घरी  करता येणारा कुक्कूट पालन हा व्यवसाय निवडण्यात आला. 'आत्मा' प्रकल्पाद्वारे या शेतकऱ्यांना  प्रत्येकी 50 गिरीराज व वनराज या सुधारीत जातीची संमिश्रित पिल्ले वाटप करण्यात आले. त्याच बरोबर अर्ध स्वयंचलीत खाद्य व पाण्याची भांडी तसेच 6 आठवड्यांपर्यंत पिलांच्या उत्कृष्ठ वाढीसाठी नामांकित कंपनीचे 50 किलो खाद्य वाटप करण्यात आले. हे शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर आणि थेट त्यांच्या बॅंक खात्यात अनुदान वितरीत करण्यात आले. हे अनुदान प्रति लाभार्थी रु.2710/- इतके होते. कुक्कूटपालन संगोपन सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांशी  नियमित संपर्क ठेवून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन व वैद्यकीय सेवा देण्यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. बी. शहा, व पशुधन पर्यवेक्षक व्ही. एस. घुगे, यांनी महत्वाची भुमिका पार पाडली. तसेच याच गावात स्वदेश फाऊंडेशन मार्फत काही शेतकऱ्यांना   शेळी पालनासाठी शेळ्या अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सध्या येथील 40 लाभार्थ्यां पैकी 38 शेतकऱ्यांचे 50 पैकी प्रत्येकी 42 ते 48 पक्षी जिवंत असून काही पक्षी विक्रीस तयार झाले आहेत, तर 50 टक्के मादी पक्षी हे मे अखेर अंडी उत्पादन देण्यास तयार होतील. त्यातून अंडी विक्रीतून त्यांना आर्थिक उत्पन्न उपलब्ध होण्यास सुरुवात झालीय.
या अभियानांतर्गत काकळ ग्रामपंचायतीत काकळ, ऊसर बुद्रुक येथे शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेत संगणक पुरवठा, फळभाजी लागवड व विक्री व्यवस्था, ठिबक सिंचन, रस्ते दुरुस्ती, व्यायामशाळा, एक अंगणवाडी,  आदी कामे मंजूर झाली आहेत. तसेच गावातील चौघा शेतकऱ्यांना शेत तलाव मंजूर झालेले असून दोन शेत तलाव पुर्ण झालेले असून उर्वरीत दोन कामे प्रगती पथावर आहेत. तसेच महिलांना व विद्यार्थ्यांना स्वच्छेतेचे प्रशिक्षण व प्रात्यकक्षिके दाखविण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी रात्रीची पाठशाला व्दारे विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा करुन उपाययोजना करण्यात आल्या.थोडक्यात गावात सर्वांगिण परिवर्तनाची कामे होऊ लागल्याने गावकऱ्यांचा आत्मविश्वास वाढीस लागला आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक