जिल्ह्यातील सर्व बीचेसवर समुद्रात 'फ्लोटींग बोयाज' पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नाविण्यपूर्ण योजनेतून उपक्रम




अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.29:- पर्यटकांचा समुद्रात पोहण्यासाठी सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर (बीचेस) फ्लोटींग बोयाज बसविण्यात येत आहेत.  अद्याप मुरुड आणि काशिद या दोन बीचेसवर हे बोयाज बसविण्यात आले असून यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपुर्ण योजनेतून 5 लाख 20 हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
पर्यटक सुरक्षा व्यवस्था अंतर्गत बीच वर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविण्यासाठी फ्लोटिंग बोयाज लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागाव, आक्षी, काशिद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांदवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई इ.सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यांवर हे बोयाज लावण्याचे काम सुरु आहे. येत्या 15 दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविणे तसेच धोकादायक पातळी दर्शविण्यासाठी याचा वापर होतो. काठापासून साधारणतः 50 ते 60 मिटर अंतरावर किंवा भरती ओहटीच्या पातळ्यांच्या अभ्यास करुन व स्थानिकाच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणे निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचे काम सुरु आहे.
 एक बोयाज म्हणजे एक मोठा चेंडू असतो तो पाण्यावर तरंगतो. त्याला वर एक निशाणी पताका लावलेली असते. खाली किमान 10 मिटर लांबीच्या दोरखंडाला तो बांधून त्याला खालच्या बाजूला दीड फुट रुंद आणि दोन फुट लांब अशी सिमेंटची प्लेट लावलेली असते. त्यामुळे फ्लोटींग बोयाज पाण्यात स्थिर राहतो. हे बोयाज खालून एकमेकांना दोरखंडाने बांधलेले असल्याने  ते नेहमी एका रेषेत राहू शकतात. त्यावरुनच पोहणाऱ्यांना सुरक्षित हद्द ओळखता येते. जिल्ह्यात 115 बोयाज बसविण्यात येत आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपयुक्त उपक्रम असून यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.
पर्यटकांना आवाहन
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे की, बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये, आपली स्वतःची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावे. प्रशासनाने प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सुचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक