कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून प्लास्टिक बंदीला विशेष मुलांचे 'पाठबळ'



            अलिबाग,जि. रायगड, दि.7 (डॉ.मिलिंद दुसाने)- प्लास्टिक बंदीच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संकल्प आणि प्रत्यक्ष कृतितून जनतेचा प्रतिसाद हवाय. प्लास्टिक समस्येचे उग्र रुप दिसते ते प्लास्टिक कॅरी बॅगच्या रुपाने. अलिबाग येथील 'पाठबळ' सामाजिक संस्थेच्या  राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी रद्दी कागदांपासून अल्पदरात कॅरीबॅग तयार करुन प्लास्टिक बंदी च्या शासनाच्या निर्णयाला कृतिशील पाठबळ दिलं आहे.
अलिबाग शहरानजिक आरसीएफ कुरुळ येथील राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांची शाळा , ही शाळा शहरातील पाठबळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालविली जाते. सध्या या संस्थेत 33 विशेष मुलं शिक्षण घेत आहेत. विशेष मुलांचे शिक्षण ही सुद्धा एक विशेष बाब असते. हे शिक्षण देण्याचे काम येथील शिक्षीका वृंद मोठ्या तन्मयतेने करतांना दिसतात.
विशेष मुलांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांचे वर्ग ठरविणे, त्यांचे शिक्षण ठरविणे, या बाबींचा त्यात समावेश असतो. या मुलांना नैसर्गिक विधींपासून सर्वच गोष्टींचे प्रशिक्षण द्यावे लागते. त्यादृष्टीने येथील कर्मचारी वर्ग सेवाभावी वृत्तीने काम करीत असतो. स्वतःचे जेवण स्वतःच्या हाताने करणे, कपडे घालणे, शारिरीक हालचालींचे नियमन करणे अशा एक न अनेक सूक्ष्म बाबी या मुलांच्या अभ्यासक्रमात असतात. त्यातच अक्षर ओळख, अंक ओळख अशा क्रमिक बाबीही समाविष्ट केल्या जातात.  शारिरीक हालचालींच्या नियमनासाठी त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षक येत असतात. त्यासाठी खास उपकरणेही शाळेत आहेत.
या शिक्षणादरम्यान मुलांमधील कौशल्य ओळखले जाते.  त्या त्या कौशल्याचा विकास करुन या मुलांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्नही शाळेतील शिक्षक करीत असतात. या शाळेच्या मुख्याध्यापिका सिमा विसे, शिक्षिका सुजाता देसाई, संध्या हजारे आणि सेविका श्रद्धा घरत या मोठ्या सेवा भावाने मुलांची देखभाल करीत त्यांना शिक्षण देत असतात.  सध्या ही मुले शाळेत ग्रिटींग कार्ड बनविणे, कागदी फाईल्स बनविणे, दिवाळीच्या कालावधीत पणत्या बनविणे, कापडी फुलं बनविणे अशी कामे करत असतात. या वस्तूंच्या विक्रीतून येणारा पैसा या मुलांना दिला जातो. पैसा कमावणे हा यामागील उद्देश नसला तरी 'आपण काही तरी करु शकतो' ही बाब मुलांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करते.  सध्याच्या प्लास्टीक कॅरीबॅग समस्येवर तोडगा काढण्यासाठी शाळेतील शिक्षिकांनी जुन्या वर्तमान पत्रांच्या कागदांपासून  कॅरीबॅग तयार करण्याच्या कामास सुरुवात केली.  येथील आरसीएफमधील लायब्ररीतून  रद्दी वर्तमान पत्रे दरमहा शाळेला विनामूल्य दिली जातात. तसेच शहरातील काही नागरीक आपल्या घरची रद्दी शाळेला दान करतात. त्यानंतर आवश्यकतेनुसार आकार ठरवून ही मुले  कागद कापुन, त्याच्या घड्या घालून, खळाने चिकटवून  विविध आकाराच्या पिशव्या बनवतात. त्यातील काही पिशव्या या सुतळीच्या बंदांच्या असतात. त्यात दोन किलो पर्यंत वजन राहू शकते.  या पिशव्यांना शिलाई मशिनवर शिलाई मारलेली असल्याने  त्यात मजबूत आणि टिकाऊ असतात.
 सध्या शहरातील काही मेडीकल दुकानदार, बेकरी चालक या मुलांनी तयार केलेल्या पिशव्या  खरेदी करत आहेत. त्यातुन ते आपल्या ग्राहकांना वस्तू देत असतात.  साधारण एका किलो कागदात 100 लहान पिशव्या तयार होतात.  तयार झालेल्या पिशव्या या 40 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होतात. मोठी पिशवी ही दीड  रुपया प्रति नग या दरात पडते.
शाळेच्या या उपक्रमांतून मुलांना चांगला सराव होतो व त्यातून त्यांचा बौद्धिक व शारिरीक विकास होण्यास मदत होते. यात मन गुंतून राहिल्याने मुले आनंदी राहतात. हे सगळ्यात मोठे समाधान. आता गरज आहे ती समाजातील विविध घटकांनी या संस्थेला पाठबळ देऊन विशेष मुलांना प्रोत्साहन देण्याची.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक