सुदृढ-सक्षम भावी पिढीसाठी पोषण आहार स्थिती सुधारणा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात राबविणार पथदर्शी प्रकल्प- केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य डॉ. राजू भंडारी



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- देशाची भावी पिढी सक्षम, सुदृढ आणि तंदुरुस्त घडवायची असेल तर माता, गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषण आहार स्थिती सुधारणा कार्यक्रम राबविणे आवश्यक असून हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील ज्या 22 ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे, तेथे प्रायोगिक तत्त्वावर राबवून संपुर्ण जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल, असे केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य डॉ. राजू भंडारी यांनी आज येथे सांगितले.
जिल्ह्यातील आहार पोषण स्थितीचे अवलोकन करुन त्याआधारे आरोग्य निर्देशांक निश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख यंत्रणांची आज आढावा बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, 'अरमान' या सामाजिक संस्थेच्या डॉ. अपर्णा हेगडे,जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा उपनिबंधक पी.एम खोडका, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग शेळके, प्रकल्प संचालक आत्मा मंगेश डावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,  जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी रामदास बघे,  महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या सह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
 यावेळी बोलतांना डॉ. भंडारी म्हणाले की, अर्भक मृत्यू दर, मातांमधील रक्ताल्पतेचे(ॲनिमिया) प्रमाण शून्यावर आणणे, कुपोषणाच्या विविध अवस्थेतील बालकांची आरोग्य स्थिती सुधारणे, मातांना गरोदर अवस्थेत उत्तम पोषण आहारासंदर्भात मार्गदर्शन करणे अशा विविध उपाययोजनांनी ही स्थिती सुधारुन जिल्ह्यातील पोषण आहार स्थिती सुधारण्यासाठी सर्व यंत्रणांच्या समन्वयाने कार्यक्रम राबविला जाईल. त्यासाठी आरोग्य सेविका, आशा सेविका यांना प्रशिक्षण देऊन ग्रामिण भागात त्यांच्यामार्फत गरोदर माता व बालकांचे दैनंदिन समुपदेशन व उपचार केले जातील.
यावेळी डॉ. अपर्णा हेगडे यांनी अरमान या संस्थेमार्फत या उपक्रमात दिल्या जाणाऱ्या सेवांविषयी सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सर्वेक्षण करुन जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याची व बालकांच्या आरोग्याची  पुनर्मांडणी करावी. तसेच तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवून या प्रकल्पाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. सुरुवातीला जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव यांनी प्रास्ताविक केले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक